विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून घेत तरुण डॉक्टरची आत्महत्या
मिरजगाव । वीरभूमी- 31-Jul, 2021, 12:00 AM
कर्जत तालुक्यामधील मिरजगाव येथील डॉ. विश्वास कवळे यांनी आजारपणाला कंटाळून स्वतःलाच विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. 30 रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान मिरजगाव येथे घटली.
या घटनेने कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मिरजगाव येथील डॉ. विश्वास अर्जुन कवळे (वय 28) हे अनेक दिवसापासून आजारी होते. अनेक औषधोपचार करूनही त्यांना फरक पडत नव्हता. या आजारपणाला कंटाळून शुक्रवार दि. 30 रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी स्वतःला विषारी औषधाचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. विश्वास कवळे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे आढळून आले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. आपण आपल्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
डॉ.विश्वास कवळे यांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मिरजगाव येथील आपल्या राहत्या घरातच त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली होती. त्यांच्या पश्चात वडील शिक्षक अर्जुन कवळे, आई, दोन विवाहित बहिणी आहेत.
डॉ. विश्वास कवळे हा त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या तरूण डॉक्टरांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments