श्रीगोंदा । वीरभूमी- 01-Sep, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा (shrigonda) तालुक्यातील विविध विकासकामांचे पत्रकबाजी करून श्रेय घेणार्या सर्वपक्षीय नेते, त्यांच्या सतरंज्या उचलणारे सर्व हस्तक कार्यकर्ते व प्रशासनाच्या सर्व विभागातील प्रमुख अधिकारी यांनी औद्योगिक वसाहत, कुकडी पाणी प्रश्नाचे (kukadi water question) वाटोळे, कोरोना (corona) संकट काळातील बेड, ऑक्सिजन कमतरतेमुळे झालेले शेकडो मृत्यू, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य जनतेची बेहाल परिस्थिती याकडेही लक्ष द्यावे.
तसेच केंद्र शासनाच्या रस्ते व गॅस पाईपलाईन ठेकेदाराला खंडणी मागणे या कामांचीही पत्रकबाजी करून जबाबदारी घ्यावी, अशी घणाघाती टीका राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा (balasaheb nahata) यांनी केली.
श्रीगोंदा बाजार समितीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब नाहाटा बोलत होते. नाहाटा म्हणाले की, दिवंगत झालेले सर्वसामान्यांचे नेते बापू, कुंडलिक तात्या, सदाशिव आण्णा, प्रा. तुकाराम दरेकर यांच्या निधनाने तालुका पोरका झाला आहे. सद्यस्थितीत प्रशासनावर कुणाचाच वचक राहिला नाही. एकाच पक्षांची शहरात दोन-दोन कार्यालये झाली पण जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी तिथे तडजोडी सुरू आहेत.
बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती करण्याऐवजी तरुणांना राजकीय बिनकामाची पदे वाटून ररस्ते व गॅस पाईपलाईन ठेकेदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी पंटर म्हणून काम करण्यास भाग पाडले जात आहे. लवकरच या नेत्यांची तक्रार त्यांच्याच पक्षातील सर्वोच्च नेते शरद पवार, अजित पवार व नितीन गडकरी यांच्याकडे करून सगळ्यांचे पितळ उघडे करण्याचा गर्भित इशारा नाहाटा यांनी दिला आहे.
प्रशासनावर हल्लाबोल करताना नाहाटा म्हणाले की, कोरोना काळात प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या आरोग्य परिस्थिती हाताळण्याच्या हलगर्जीपणाकडे मी लक्ष वेधले असता तत्कालीन तहसीलदारांनी 65 लाख मोजून श्रीगोंद्यात रुजू झाल्याचे सांगितले तर प्रांतांनी थट्टा उडवत आमच्या कामात लक्ष देऊ नका, असे सुनावले.
ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा अधिकार्यांमुळे जीव गेल्याचा आरोप नाहाटा यांनी केला. तर कुकडीच्या आवर्तनात तालुक्याचे सुपुत्र अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ व कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे हे भ्रष्ट अधिकारी शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत. यांची लवकरच चौकशी लावणार असल्याचे सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष टिळक भोस म्हणाले की, अधिकारी व पदाधिकार्यांचे साटेलोटे असून आपण तहसील कार्यालय, नगरपालिका व पोलिसांची चौकशी लावणार असल्याचे सांगितले.
यावेळी नाहाटा यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अख्तर शेख, बापूराव सिदनकर उपस्थित होते.
biCYpoKDfcenIF