बोधेगाव । वीरभूमी- 27-Sep, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी, बोधेगावसह परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.
कार्यवाही न झाल्यास बालमटाकळी व परिसरातील असंख्य शेतकर्यासह मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी बालमटाकळी येथे शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सकाळी 8 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राजपुरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शेवगावचे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बालमटाकळी व परिसरात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होऊन अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकर्यांचे कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यासह आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडून गेली आहेत.
तसेच बालमटाकळी ते कांबी रस्त्यावर गावाजवळ असलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये जाण्या-येण्याचा रस्ता बंद झालेला आहे. तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या बांधकाम केलेल्या विहिरी ढासळून बुजल्या आहेत. तरी झालेल्या सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी.
अन्यथा बालमटाकळीसह परिसरातील असंख्य शेतकर्यासह तसेच विविध पक्षाच्या पदाधिकार्यासह मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी बालमटाकळी येथे शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावर सकाळी 8 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे.
सदरील निवेदनावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, बालमटाकळी गावच्या सरपंच सौ. कौशल्या कवडे, उपसरपंच तुषारभाऊ वैद्य, अशोक खिळे, धनंजय देशमुख, विक्रम बारवकर, संदीप देशमुख, हरीचंद्र घाडगे, वसंतराव घाडगे, राम तांबे, शेखर बामदळे, अंकुश मसुरे, राम बामदळे, अनिल परदेशी यांच्या सह आदी शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार सुजय विखे, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, तालुका कृषी अधिकारी शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव यांना दिल्या आहेत.
Comments