पाथर्डी । वीरभूमी- 27-Sep, 2021, 12:00 AM
एकीकडे राज्य उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे हे विना विलंब रोहित्र बदलून देण्याबाबत महावितरणच्या अधिकार्यांना सुचना देतात. मात्र त्यांच्या सुचना महावितरणचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे.
सुमारे महिनाभरापासून पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी येथील खराब झालेले वीज रोहित्र बदलून मिळण्यासाठी ग्रामस्थांना सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील जीरेवाडी गावातील मोठा भाग वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अनेक महीन्यापासून वीजेविना अंधारात आहे. वीज रोहीत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिरेवाडीचे सरपंच उमाजी पवार, उपसरपंच राजेंद्र आंधळे, राजेंद्र बडे, नवनाथ आंधळे, प्रहार अपंग आघाडीचे शिवाजी बडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आधंळे यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यापासून लाईट बिल भरून घेऊनही अद्याप खराब झालेले रोहीत्र दिले नाही. अनेक दिवसांपासून शेतकरी आक्रमक आहेत. सहाय्यक अभियंता मुंढे यांना प्रहार पक्षाच्या वतीने निवेदन दिले. रोहीत्राची मागणी केली होती. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे प्रहारच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांच्या घोषणाबाजीने कार्यालय परीसर दणाणून गेला.
यावेळी सहायक अभियंता मुंढे यांनी वरिष्ठांना कल्पना देत, अति.कार्यकारी अभियंता यांच्याशी फोनवर चर्चा केली. लवकरात लवकर शेती पंप रोहित्र देऊ या आश्वासनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे, नवनाथ आंधळे, प्रहार अपंग आघाडीचे शिवाजी बडे, बाळू आंधळे, पांडू आंधळे, सुनिल आंधळे, जयदीप घोरपडे, विलास बडे व जिरेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.
राज्यऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जिल्ह्यातच रोहित्रसाठी शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ येत असल्याने ही दुदैवाची बाब आहे. यामुळे ग्रामस्थ व शेतकर्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे.
Comments