जिल्ह्यातील हे धरणही ओव्हरफ्लो
35 वर्षात अवघ्या 18 वेळेस शंभर टक्के भरले धरण
मिरजगाव । वीरभूमी- 28-Sep, 2021, 12:00 AM
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. कर्जत, आष्टी, श्रीगोंदा, जामखेड या भागाला वरदान ठरलेले कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण सप्टेंबर महिन्याच्या अखेरला आज दि. 28 रोजी सकाळी 6 वाजता 100 टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.सीना धरणाची पाणी साठवण क्षमता 2400 द.ल.घ.फू. असुन मृतसाठा 552 द.ल.घ.फू. तर गाळ 185 दलघफू व उपयुक्त साठा 1847.33 आहे. तर एकूण साठा टक्केवारी 100 आजचा पाऊस 200 (मी.मी.) एकूण पाऊस 550 (मी.मी) आजची आवक 88.61 द.ल.घ.फू. एकूण आवक 1644.32 द.ल.घ.फू असुन उजव्या कालव्याद्वारे 51.61 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरण पाणलोट क्षेत्रातून सांडव्यावरुन 56 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती, सीना धरण मध्यम प्रकल्प उपविभागीय अभियंता बबनराव वाळके यांनी दिली.
मागील काही दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडत असलेल्या दमदार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. नवीन पाण्याची आवक होत असल्याने सांडव्यावरून सीना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असुन सीना नदी वाहती झाली आहे.
सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने येथील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. धरण पाणलोट मध्ये कर्जत तालुक्यातील सात हजार सहाशे बहात्तर हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सातशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ओलिताखाली येत आहे.
कर्जत, आष्टी बरोबरच जामखेड, श्रीगोंद्यातील काही भागाला देखील धरणातील पाण्याचा उपयोग होईल. तत्कालीन माजी मंत्री स्व.आबासाहेब निंबाळकर यांच्या पाठपुराव्यातुन सन.1972 साली सीना नदी वरील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणाच्या कामास सुरुवात झाली.
सीना धरण प्रकल्प कालव्याचे काम सन 1985 मध्ये पूर्ण होवून प्रत्यक्ष सिंचनास सुरूवात झाली. आतापर्यंत सीना धरण परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाले असून पूर्ण क्षमतेने वाहीले असल्याचा इतिहास आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आॉगस्टच्या सुरुवातीला धरण ओव्हरफ्लो झाले होते.
यंदा पुन्हा एकदा धरण ओव्हरफ्लो झाल्याने कर्जत तालुक्यातील या जिरायती भागातील शेती व्यवसायाला चांगले दिवस आल्याची चर्चा येथील लाभक्षेत्रातील शेतकर्यांमधून होत आहे. गेली 35 वर्षात सीना धरण अवघे 18 वेळेस ओव्हरफ्लो झाल्याचा इतिहास आहे.
यंदा धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. सोमवार दि.27 रोजी आ. रोहित पवार यांच्या आदेशानुसार निमगांव गांगर्डा येथील सीना धरणातून उपविभागीय अभियंता बबनराव वाळके, शाखाधिकारी बोरुडे, लोखंडे, मोरे यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, मिरजगावचे मा. सरपंच नितीन खेतमाळस, एकनाथ गांगर्डे मेजर, प्रविण तापकिर, तानाजी पिसे, गणेश नलावडे, बांदल सर, विकास झांबरे, भाऊसाहेब पवार आदी उपस्थित होते.
सीना धरण भरल्याने शेती सिंचनाच्या पाण्याचे नियोजन योग्यरित्या केले जाईल. सीना धरणाच्या सांडव्याद्वारे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठच्या गावातील जनतेने दक्षता बाळगावी, असे आवाहन सीना मध्यम प्रकल्पाचे उपविभागिय अभियंता बबनराव वाळके यांनी केले आहे.
Comments