श्रीगोंदा । वीरभूमी- 28-Sep, 2021, 12:00 AM
मिसिंग प्रकरणात तपासी अधिकारी असलेला बेलवंडी पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार प्रकाश आसाराम बारवकर (वय 56 वर्षे) बक्कल नंबर 428 याला मिसिंग प्रकरण बंद करण्यासाठी 22 हजार रुपयांची लाच मागितल्या नंतर ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने अहमदनगर लाचलुपचत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला.
बेलवंडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारवकर याला ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलिस हवालदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हारुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीसवाडी, येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील तक्रारदार यांच्याकडे आरोपी लोकसेवक याने त्याच्याकडील तपासासाठी असलेल्या मिसींग प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन देऊन मिसिंग प्रकरण बंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने दि. 17 सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दिली.
त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत आरोपी लोकसेवक याने बेलवंडी पोलीस ठाण्यात पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडील 50 हजाराच्या मागणीत तडजोडीअंती 22 हजार रुपयांची लाचेची मागणी केली व ही रक्कम स्विकारण्याची संमती दर्शवली म्हणून बारवकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा असल्याने व अलीकडच्या काळात नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता निर्माण झाल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी सापळ्यात सापडत आहेत. जिल्ह्यात अनेक अधिकारी, कर्मचारी अडकूनही लाच घेण्याची प्रवृत्ती कमी होताना दिसत नाही.
निर्ढावलेल्या कर्मचार्यांना भरमसाठ पगार असूनही संकटात सापडलेल्या नागरिकांना लुटण्याचा मोह आवरत नाही. याबाबत प्रशासकीय पातळीवर समुपदेशन केंद्र चालवण्याची गरज आहे. नागरिकांनाही ’नाहीरे’ म्हणण्याची सवय लावून घेण्याची गरज आहे.
नागरिकांना त्यांच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
jBkgvqrEUD