राज्य सरकारने अध्यादेश राज्यपालकांकडे पाठविला
मुंबई । वीरभूमी- 29-Sep, 2021, 12:00 AM
2019 च्या हिवाळी अधिवेशनात आगामी महापालिका निवडणुका एक सदस्यीय पद्धतीने घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन यामध्ये मुंबई वगळता महापालिकेत तीन सदस्यीय पद्धतीय प्रभाग रचना करून निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र या निर्णयाला राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला होता. मात्र हा विरोध झुगारून लावत महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग, नगर पालिका अथवा नगपरिषद निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग तर नगरपंचायत निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. याबाबतचा अध्यादेश राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
राज्य सरकारने पाठविलेला अध्यादेशावर राज्यपालांची मंजुरी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मुंबई वगळता महापालिकामध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तसेच नगर पालिका अथवा नगर परिषद निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग रचना तर नगरपंचायतीमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे.
महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने विरोध करत दोन सदस्यीय प्रभाग रचना करावी, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
आता या अध्यादेशावर राज्यपाल स्वाक्षरी करणार का? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
lCDImxnHqUGXNL