89 हजार क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग
पैठण । वीरभूमी- 30-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा 98.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे धरणाच्या 27 दरवाजातून तबबल 89 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
गोदावरी नदी पात्रात 1 लाख 16 हजार क्युसेकपर्यंतचे पाणी सामावू शकते. मात्र जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग 1 लाखांपर्यंत ठेवण्यात येणार असल्याने पात्र सोडून पाणी जाणार नाही. यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आल्याने नदी काठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे.
अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणाकडे पाण्याची आवक वाढून बुधवारी रात्री धरणातील पाणीसाठा 98.62 टक्क्यांवर गेल्याने रात्री 11.30 वाजता धरणाच्या 27 दरवाजातून तब्बल 89 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
धरणाच्या 27 पैकी 18 दरवाजे 4 फुटाने तर 9 दरवाजे अर्धा फुटांनी उघडण्यात आले आहे. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने गोदावरी नदी पात्रात 1 लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी धरणातून बुधवारी सकाळी 4 दरवाजातून पाणी सोडण्यात आल्यानंतर यात वाढ करत रात्री 11.30 पर्यंत 27 दरवाजातून 89 हजार क्युसेकने गदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. या अगोदर 2005 ते 2009 असे सलग पाच वर्षे धरण भरले होते.
2006 मध्ये धरण भरल्यानंतर तब्बल 2 लाख 54 हजार क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2019, 2020 आणि 2021 मध्येही सलग धरण भरल्याने विसर्ग करण्यात आला.
XaHPNvYCkxR