पाथर्डी । वीरभूमी- 30-Sep, 2021, 12:00 AM
शेवगाव-पाथर्डी विधानसभेत राष्ट्रवादीचा पराभव थोड्या मताने झाला. यामुळे आगामी विजयासाठी मायनस झालेली मते प्लस करावी लागतील. ही मते प्लस करण्यासाठी गणित सुधारले पाहिजे, असा सल्ला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घुले-ढाकणे व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील पाथर्डी तालुका दौर्यावर आले होते. यावेळी संस्कारभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले, प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, रक्षणा सलगर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, मंजुषा गुंड, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे आदीसह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना ना. जयंत पाटील म्हणाले, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादीचा विजय हा राजकीय गणितावर अवलंबून आहे. यामुळे अगोदर प्लस-मायनसचे गणित समजून घेतले पाहिजे. जी मते मायनस झाली आहेत ती प्लस करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. यासाठी बुथ कमिट्या तयार करून पक्षसंघटन मजबूत करावे लागेल, असा सल्ला पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, काही वर्षापुर्वी श्रीक्षेत्र भगवानगडाला ब वर्ग दर्जा दिला होता. त्याप्रमाणे भगवानगड व परिसरातील गावांच्या नळपाणीपुरवठा योजनेबाबत लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल. माझ्यासारख्याकडून भगवानबाबांची सेवा होणे हे माझे भाग्य आहे. गडावर जावून संत भगवानबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्र कोरोनामुळे मंदिरे बंद असल्यामुळे ते शक्य झाले नाही. मात्र यापुढे नक्की फक्त भगवानबाबांच्या दर्शनासाठी पुन्हा येईन, असा शब्द ना. पाटील यांनी दिला.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येत आहेत. लवकरच शेतकर्यांसाठी चांगला दिलासा दिला जाईल. शेतकर्यांनी धीर धरावा तसेच सरकारनेही आता आपल्या अडचणी सांगण्याऐवजी अडचणीवर मात करुन शेतकर्यांना मदत करावी, असे ना. पाटील यांनी सांगत दिलासा दिला.
Comments