मदतीसाठीचा 22 कोटींचा प्रस्ताव पाठवला : निचित
अहमदनगर । वीरभूमी- 05-Oct, 2021, 12:00 AM
नगर जिल्ह्यात 1 जून ते 29 सप्टेंबर या काळात अतिवृष्टीमुळे 53 हजार 111.59 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे गुलाब चक्रीवादळाने झाले. चार महिन्यांत अतिवृष्टीमुळे 61 हजार 635 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
महसूल प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठीचा 22 कोटी 67 लाख 42 हजारांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यात जून महिन्यात अतिपावसामुळे 87 हेक्टर क्षेत्रावरील 359 शेतकर्यांचे नुकसान झाले होते. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 9 हजार 748 क्षेत्रावरील 14 हजार 921 शेतकर्यांचे नुकसान झाले.
26 ते 29 सप्टेंबर दरम्यान गुलाब चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 29 हजार 187 हेक्टर क्षेत्रावरील 25 हजार 589 शेतकर्यांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून 22 कोटी 67 लाख 42 हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, असे निचित यांनी सांगितले.
चार महिन्यात अतिवृष्टीमुळे 1 हजार 36 घरांचे नुकसान झाले आहे. 403 जनावरे मृत पावले आहेत.1 हजार 807 घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व वादळी वार्यामुळे राहता तालुक्यात वीज कोसळून एकाचा तर शेवगाव तालुक्यातील वडुले येथील पुरात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली, असे निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी सांगितले.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका पाथर्डी व शेवगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीनंतर दुसर्या दिवशी आमदार मोनिका राजळे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या भागाची पाहणी केली. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत नुकसानग्रस्तांना कोणतीच मदत मिळाली नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याभागाकडे येण्याचे टाळले. यामुळे नुकसानग्रस्तांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री न आल्याने नुकसान भरपाईस उशिर तर होत नाही ना? असा सवाल उपस्थित झाला आहे.
rZlXomdhuiLCzwDO