अहमदनगर । वीरभूमी- 05-Oct, 2021, 12:00 AM
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तुटणे गरजेचे आहे. यामुळे ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोना बाधित असतील अशा 61 गावांमध्ये काल दि. 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या काळात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आणखी 8 गावांमध्ये आज दि. 5 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या काळात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये नेवासा 1, पारनेर 4, संगमनेर 2 व शेवगाव 1 अशा आठ गावांचा समावेश आहे.
जास्त सक्रीय कोरोना बाधित असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 61 गावांमध्ये निर्बंध लागू केल्यानंतर आज यामध्ये आणखी आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
आज कडक निर्बंध जाहीर केलेल्या गावांमध्ये नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेर तालुक्यातील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी. संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी आझमपूर तर शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
वरील गावांमध्ये दि. 14 ऑक्टोबर पर्यंत अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडीकल, टेस्टींग सेंटर इत्यादी वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा इ. बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
तसेच निर्बंध जाहीर केलेल्या गावांमध्ये जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई तसेच कृषी माल व अत्यावश्यक वस्तू वगळता वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत.
यामुळे कडक निर्बंध असलेल्या गावांची संख्या 69 वर पोहोचली आहे. या गावांमध्ये लोकसंख्येने मोठी व व्यापारी पेठ असलेल्या गावांचा समावेश आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग मोठ्या गावांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे प्रत्येकाने घराबाहेर जातांना मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
urMjUdlVYoDP