श्रीगोंदा । वीरभूमी- 23-Oct, 2021, 12:00 AM
तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथील एका महिलेच्या घरात घुसून कपाटाची उचकापाचक करून तब्बल 2 लाख 25 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लांबविले होते. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी चोरीचा सात दिवसात जलद तपास करत स्थानिक चोर शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर याला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.16 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा कारखाना येथील रहिवासी मिनाबाई विष्णू बांगर यांनी फिर्याद दिली की, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
गुन्ह्याचा अधिक तपास करताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही घरफोडी शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर (वय 25, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा) याने केल्याचा संशय आहे. संशयितास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर व कर्मचार्यांनी ताब्यात घेवुन चौकशी करण्यास सांगितले.
अधिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन सोन्याचे मणी, कानातील झुबे व गळ्यातील गंठण असे 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगवले हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी, फौजदार अंकुश ढवळे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, हवालदार प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी केली आहे.
lOHCqinm