बेपत्ता सत्यमचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला
नेवासा । वीरभूमी- 27-Oct, 2021, 10:38 PM
तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बेपत्ता असलेल्या सत्यम संभाजी थोरात (वय 6 वर्षे) याचा मृतदेह छिन्न विछन्न आढळून आला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये प्रमोद अंकुश थोरात (वय 42), विनायक उर्फ विनोद अंकुश थोरात (वय 44), गणेश शेषराव मोरे (वय 32) व रमेश शेषराव मोरे (वय 30) अशी नावे असून या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सत्यम संभाजी थोरात (वय 6) हा बुधवार दि. 20 रोजी सायंकाळ पासून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेवूनही तो न सापडल्याने त्याचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत नेवासा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
याबाबत सत्यमची आजी प्रमिला शिवाजी थोरात यांनी फिर्याद दिली होती. दरम्यान सोमवार दि. 25 रोजी बालाजी देडगाव - माका शिवारात असलेल्या एका शेतामध्ये सत्यम याचा मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आला.
सत्यमचे दोन्ही हात, उजवा पाय घोट्यापासून तोडलेला आढळून आला. तसेच त्याचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला आढळला. मृतदेह आढळल्यानंतर याबाबतची माहिती बालाजी देडगावचे सरपंच यांनी नेवासा पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याबाबत सत्यमची आजी प्रमिला थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद अंकुश थोरात (वय 42), विनायक उर्फ विनोद अंकुश थोरात (वय 44), गणेश शेषराव मोरे (वय 32) व रमेश शेषराव मोरे (वय 30) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
Comments