युवा शेतकरी महादेव राजळे यांचा यशस्वी प्रयोग । दहा महिण्यातच लगडली फळे
पाथर्डी । वीरभूमी - 11-Nov, 2021, 11:01 AM
‘काश्मिरी अॅपल बोर’ हे फळ पीक दिसायला सफरचंदासारखे असून अत्यंत चविष्ट आहे. त्यामुळे या फळाला इतर राज्याकडून चांगली मागणी आहे. हे फळ कमी कालावधीत व कमी पाण्यावर भरघोस उत्पादन देत आहे.
पावसाचा लहरीपणा व पाणी टंचाईवर मात करत पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील युवा शेतकरी महादेव यशवंत राजळे यांनी नवीन पीकपद्धतीचा व त्यातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून काश्मिरी अॅपल बोर या जातीचे फळपीक 40 गुंठे क्षेत्रावर डिसेंबर 2020 मध्ये यशस्वीपणे लागवड केली.
महादेव राजळे यांनी अॅपल बोर पिकाच्या यशस्वी लागवडीतून परिसरातील इतर शेतकर्यांसमोर आदर्श ठेवला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व जास्त उत्पन्न देणारे बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने अनेक शिक्षित शेतकरी आपल्या शेतावर कृषीविषयक विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेत आहेत. याचाच प्रत्यय राजळे यांच्या शेतावरील प्रयोगाकडे पाहिल्यास येतो.
महादेव राजळे हे युवा शेतकरी इतर शेतकर्यांप्रमाणेच मागील चार-पाच वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसाने हवालदिल झाले होते. त्यामुळे पावसाच्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून नवीन पीक पद्धतीचा वापर करावा, याबाबत त्यांनी विचार सुरू केला.
परंपरागत पीक पद्धतीला फाटा देऊन पावसाची अनियमितता व वातावरणातील बदलाप्रमाणे नवीन पिके घेण्याचा त्यांनी विचार केला. राजळे यांनी आपल्या शेतात डाळिंब, संत्रा अशी फळबाग लागवड केलेली आहे. त्यातच त्यांनी 40 गुंठे क्षेत्रावर काश्मिरी अॅपल बोराची लागवड केली आहे.
त्यांनी अगोदर काश्मिरी अॅपल बोर पिकाविषयी माहिती घेतली. याकरिता काश्मिरी अॅपल बोर घेणार्या शेतकर्यांच्या राजळे यांनी भेटी घेतल्या. तसेच विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी काश्मिरी अॅपल बोरची माहिती घेतली. पुरेशी माहिती मिळाल्यानंतर आणि हे पीक आपल्या शेतात घेण्याचा विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांनी सदरील पीक आपल्या शेतावर घेण्याचे निश्चित केले.
काश्मिरी अॅपल बोर लागवडीचा निश्चय केल्यानंतर त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये अॅपल बोराची लागवड केली. ही लागवड त्यांनी 10 बाय 8 फुटावर अशी सुमारे 400 काश्मिरी अॅपल बोर रोपांची लागवड केली. ही झाडे फक्त दहा महिण्यातच उत्पादनक्षम झालेली असून पहिल्याच वर्षी प्रति झाड 15 ते 20 किलो प्रमाणे उत्पादन निघेल असा अंदाज महादेव राजळे यांनी व्यक्त केला आहे.
काश्मिरी अॅपल बोर ही फळे चवीला अत्यंत गोड व स्वादिष्ट आहेत. स्थानिक बाजारपेठेत अॅपल बोरांना चांगली मागणी राहील असा विश्वास महादेव राजळे यांनी व्यक्त केला आहे. ग्रीन अॅपलपेक्षा या बोरांना जास्त मागणी आहे, असेही राजळे यांनी सांगितले.
काश्मिरी अॅपल बोर हे फळपीक डाळिंब, द्राक्ष व इतर फळपिकांपेक्षा कमी खर्चात व अल्प कालावधीत चांगले उत्पन्न देणारे फळ असल्याने दुष्काळी परिस्थितीवर कासार पिंपळगावचे शेतकरी महादेव राजळे यांनी यशस्वीपणे मात केली आहे.
Comments