स्पर्धेतील निबंध नितीन गडकरींना पाठविणार । भाजपाच्या युवा नेत्यांकडून स्पर्धेचे आयोजन
पाथर्डी । वीरभूमी- 14-Nov, 2021, 11:56 PM
तालुक्यातुन जात असलेल्या कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाची संपूर्ण दुरावस्था झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे युवा नेते मुकुंद गर्जे यांनी उपाहासात्मक खुली निबंध स्पर्धा आयोजित करुन प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधले आहे.
या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट पडले आहे. अनेक जणांचा बळी या अर्धवट कामामुळे गेला. अनेकांना अपंगत्व आले. वाहन दुरुस्तीसाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जास्त इंधन व वेळ खर्च होत असल्याने राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होते.
मेहकरी ते फुंदे टाकळी या दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळे अपघाताची मोठी मालिकाच या रस्त्यामुळे घडत आहे. या स्पर्धेद्वारे लोकांच्या भावना निबंध स्पर्धेतून जाणून घेऊन हे सर्व निबंध केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पाठवण्यात येणार आहेत.
या अनोख्या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 11 हजार 111, द्वितीय बक्षीस 7 हजार 777 तर तृतीय बक्षीस 5 हजार 555 रुपये देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग बाबत जनतेच्या अपेक्षा व वास्तव आपल्या लेखणीतून निबंध स्पर्धेच्या माध्यमातून मांडता येणार आहे. बोलून दाखवता येत नसेल तर आपल्या भावना लिहून व्यक्त करता येणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी त्यांनासुद्धा संशोधनास उपयुक्त ठरेल अशा अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. ही निबंध स्पर्धा 20 नोव्हेंबरपर्यंत आयोजित केली आहे. सर्व सहभागी स्पर्धकांचे निबंध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्री नितीन गडकरी यांना भेट देण्यात येणार असल्याची माहिती मुकुंद गर्जे यांनी दिली आहे.
या निबंध स्पर्धेसाठी आयोजकांनी नियम व अटी घातल्या आहेत. यामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना निंबधातून दुखावल्या जावू नये. निबंध ए-4 साईज कागदावर लिहिलेला असावा. निबंधासोबत स्पर्धकाने पत्ता व संपर्क क्रमांक नोंद करुन बंद पाकीटात मुदतीत जमा करावा, असे कळविले आहे.
महामार्गाच्या दुरावस्थेबाबत निबंध लिहुन ते राजेंद्र जनरल स्टोअर्स, नवी पेठ, पाथर्डी आणि भगवान गॅस एजन्सी, शेवगाव रोड, पाथर्डी या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
याबाबतचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. त्याद्वारे नागरिकांना या निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments