कर्जत । वीरभूमी - 20-Nov, 2021, 10:53 AM
कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले त्यांच्या निवासस्थाना लगत अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर पकडला असता पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असणार्या एका पोलीस कर्मचार्याने चक्क थोरबोले यांनाच शिवीगाळ केली. यासह तो अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर देखील पळवून नेला. या घटनेने महसुल प्रशासनासह पोलीस दलात एकच खळबळ उडाली. कदाचित राज्यातील प्रथमच घटना असेल एका वाळूतस्कर सरकारी पोलीस कर्मचार्याने महसुलच्या वरिष्ठ अधिकार्यांस शिवीगाळ केली.
शुक्रवार, दि. 19 रोजी सकाळी 7:27 च्या सुमारास बालाजीनगर या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सदर बाब तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या कानावर टाकली. आगळे यांनी तात्काळ तलाठी दीपक बिरुटे, रवींद्र लोखंडे, धुळाजी केसकर आणि मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रीक यांच्यासह नियोजित ठिकाणी रवाना झाले. यावेळी सदर पथकास (एमएच 12, आरएन 4704) या टीपरमध्ये जवळपास तीन ब्रास वाळू असल्याचे दिसले. त्यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता तेथे लगतच एका चारचाकीजवळ निळा पांढर्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेले इसम केशव व्हरकटे याने आपण स्वतः पोलीस असून टीपर खाली करून देण्यास सहकार्य करावे असे सांगितले. मात्र प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी सदर टीपर प्रांत कार्यालयात जमा करावे असे आदेश दिले.
यावेळी थोरबोले यांनी यासर्व घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये सुरू केले होते. पोलीस कर्मचारी असणारा केशव व्हरकटे याने त्यास अडथळा आणत चक्क प्रांताधिकारी थोरबोले यांना दमबाजी, शिवीगाळ केली. आणि सदरच्या टीपरमधील वाळू खाली करीत पळवून नेला.
टीपर चालक अज्ञात इसम आणि निळा पांढरा टीशर्ट नामक पोलीस कर्मचारी सांगणारा केशव व्हरकटे याच्यावर तलाठी दीपक बिरुटे यांच्या फिर्यादीनुसार भादंवी कलम 379, 186, 504, 34 भारतीय पर्यावरण कायदा 3, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे पुढील घटनेचा अधिक तपास करीत आहे.
दि. 6 मार्च 2021 रोजी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि त्यांच्या पथकाने बारडगाव सुद्रीक शिवारात एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. सदरचा ट्रक (क्र. एमएच 12, केपी 0046) पथकाने प्रांत कार्यालयाच्या आवारात आणून जमा करीत पुढील कारवाईसाठी सीनानदी परिसरात गेले होते. पहाटेच तो ट्रक प्रांत कार्यालयाचे गेट तोडून पळवून नेण्यात आला होता. याबाबत रीतसर गुन्हा दाखल केला असताना देखील आजमितीस देखील तो ट्रक कर्जत पोलिसांना सापडला नाही हे विशेष वाटत आहे.
साहेब, पोलीस दलात आणखी किती वाळूतस्कर कर्मचारी हे एकदा तपासाच
पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे हा वाळू तस्कर असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. यासह कायद्याचे ज्ञान असणार्या व्हरकटे याने चक्क प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनाच शिवीगाळ करीत अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर त्यांच्या सामोर नाकावर टिचून नेला. एका वरिष्ठ अधिकार्यांस अडथळा आणून शिवीगाळ करणे एवढी मजल जातेच कशी? अशी चर्चा दिवसभर कर्जत शहरात सुरू होती. तसेच कर्जत पोलीस दलात आणखी किती वाळूतस्कर कर्मचारी असतील आता पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे.
FYahRsHDuzqeT