वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
श्रीगोंदा । वीरभूमी- 20-Nov, 2021, 02:42 PM
श्रीगोंदा शहराजवळील घोडेगाव रस्त्यावर आंबील ओढा परिसरात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची व दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात राशीन येथे कार्यरत आरोग्य सेवक म्हणुन कार्यरत असलेले नवनाथ विठ्ठल काशीद (वय वर्षे 34) हे जागीच ठार झाले.
तर दुसर्या अपघातात निमगाव खलु येथील शेतकरी सतिष किसन कातोरे (वय 51 वर्ष) हे शेतामध्ये ऊसाचे पिकास पाणी देवून पायी घरी येत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेने त्यांना जोराची धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन जागीच ठार झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राशीन येथून ड्युटी संपवून घरी येत असताना श्रीगोंदा-घोडेगाव रस्त्यावर दुचाकी (एमएच. 16 बी.एक्स 8937) येत असताना शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अंबालीका कारखान्याकडे जाणारा दोन ट्रेलर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एम.एच.16 बी.एम. 4555) यांची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात नवनाथ विठ्ठल काशीद (वय वर्षे 34, रा. बालाजीनगर, श्रीगोंदा. मुळगाव रा. खर्डा, ता. जामखेड) हे जागीच ठार झाले.
यावेळी ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) याने जखमीस कोणतीही मदत न करता व अपघाताची खबर न देता पोबारा केला. याबाबत मयताचे चुलते शंकर रामचंद्र काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत निमगाव खलु येथील शेतकरी सतिष किसन कातोरे (वय 51 वर्ष) हे शेतामध्ये ऊसाचे पिकास पाणी देण्यास गेले असताना रात्री साडे अकराच्या दरम्यान वीज आल्याने ऊसाच्या पिकास पाणी देऊन घरी निमगाव खलु येथे पायी येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना अचानक आलेल्या रेल्वे गाडीची त्यांना जोराची धडक बसल्याने झालेल्या गंभीर अपघातात जखमी होवून जागीच ठार झाले.
याबाबत शिवाजी सतिष कातोरे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
YbOnIwsea