प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन मागे
कार्यवाही न झाल्यास 1 जानेवारीला महसूल मंत्र्यांच्या दारात आंदोलन ः ग्रामस्थ
श्रीगोंदा । वीरभूमी- 20-Nov, 2021, 04:08 PM
श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे अगोदरच गावठाण जागा अपुरी आहे. संपूर्ण गावाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणंद रस्ता व बाजारतळाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने पारदर्शक मोजणी करून तहसीलदार यांनी अतिक्रमणे काढली नाहीत तर समस्त मढेवडगाव ग्रामस्थ येत्या 1 जानेवारी रोजी संगमनेर येथे महसूल मंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलन करतील, असा इशारा देत मढेवडगाव ग्रामस्थांनी नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर शनिवार दि. 20 रोजी केलेला रास्तारोको आंदोलन मागे घेतले.आज शनिवारी काष्टी येथील आठवडे बाजार असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. मात्र अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलन सुरु होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत लेखी दिल्यामुळे आंदोलन अल्पकाळ चालले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे म्हणाले की, शासनाने राजस्व अभियान अंतर्गत पाणंद रस्ते, शीव रस्ते व शेती करण्यासाठी वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासाठी विविध योजना आणल्या. प्रत्यक्षात मात्र महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाच्या निष्क्रियतेमुळे या योजना कागदोपत्रीच दिसत आहेत. ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था असूनही त्यांच्या मागणीला प्रशासन केराची टोपली दाखवत आहे.
यावेळी अंबादास मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे यांची भाषणे झाली. यापूर्वीही या प्रश्नासाठी अनेक आंदोलने झालेली आहेत. मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गट. नं. 445 व 446 मधून जाणारा पूर्वापार वहीवाटीचा पाणंद रस्ता व आठवडे बाजाराच्या जागेत गावातील एका बड्या राजकीय नेत्याने व त्याच्याच कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्याने अतिक्रमण केले असल्याने ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव येथे शनिवार दि.20 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 9: वाजता आंदोलनाला सुरुवात झाली.
तहसीलदार यांच्यावतीने निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे व भूमिअभिलेख उपअधीक्षक संदीप गोसावी यांनी अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु आश्वासनाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाहीतर दि. 1 जानेवारी रोजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या आंदोलनात सरपंच महानंदा मांडे, रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडे, अंबादास मांडे, गेना मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे, राजेंद्र उंडे, राजेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडे, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, बापू बर्डे, काळूराम ससाणे, भगवान धावडे, वामन मांडे, प्रविण वाबळे, बापू गाडे, संजय गाडे, त्रिंबक मांडे, उत्तम मांडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या दीड वर्षांपासून अतिक्रमणे हटविण्यासाठी कायदेशीर मार्गाने अनेक आंदोलने केली. मात्र श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचार्यांच्या गलथान कारभारामुळे मढेवडगावसह अनेक गावांचे प्रश्न रखडले आहेत.
हे कार्यालय बेकायदेशीर आर्थिक उलाढाल, राजकीय नेते व एजंटच्या इशार्यावर काम करते असा अनेक नागरिकांचा आरोप आहे. रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यावर तात्काळ नायब तहसीलदार पंकज नेवसे, भूमी अभिलेख उपअधीक्षक संदीप गोसावी, मंडळाधिकारी जनार्दन सदाफुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी यांनी अतिक्रमणे काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन अल्पकाळ चालले.
आंदोलन प्रसंगी काही विद्यार्थ्यांची अहमदनगर येथे डीएड परीक्षा असल्याने त्यांना वाट मोकळी करून देण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी आंदोलनकर्त्यांचे आभार मानले.
Comments