शिवसैनिकांनो मरगळ झटकून कामाला लागा
पारनेरच्या मेळाव्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्यकर्त्यांना सुचना
लतिफ राजे । वीरभूमी- 21-Nov, 2021, 02:28 AM
पारनेर ः महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले. मात्र याचवेळी पारनेरचे माजी आ. विजय औटी यांचा पराभव झाल्याने पारनेरकर यांची यावेळी मंत्रिपदाची फार मोठी संधी गेली आहे.मात्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचा मंत्री म्हणून सांगतो, आम्ही शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. जर कोणी शिवसैनिकाला त्रास दिला तर मात्र आम्हीही गडाख आहोत, असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पारनेर येथे तालुका शिवसेना मेळावा प्रसंगी इशाराच दिला.
पारनेर शहरातील मनकर्णिका मंगल कार्यालयात पारनेर तालुका शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे, ताराबाई चौधरी, पारनेर तालुका प्रमुख विकास रोहोकले, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, युवानेते अनिकेत औटी,
पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, उपशहर प्रमुख रमीज राजे, पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर नगरे, नगराध्यक्षा वर्षाताई नगरे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, तालीम संघाचे तालुकाध्यक्ष युवराज पठारे, ढवळपुरीचे सरपंच राजेश भनगडे, भाळवणीच्या सरपंच लीलाताई रोहोकले, शिवसेना महिला आघाडी प्रमुख डॉ वर्षा पुजारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, पारनेर शिवसेनेत जी मरगळ आली आहे ती झटकून शिवसैनिकांनी आता विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तालुक्याच्या राजकारणात भरारी घेतली पाहिजे. माजी आमदार विजय औटी हे सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यकाळात खूप भरीव कामे झाली आहेत. मात्र तरीही त्यांचा पराभव का झाला याचे शिवसैनिकांनी आत्मपरिक्षण करून नव्या जोमाणे कामाला लागले पाहिजे. राज्यासमोर अनेक अडचणी आहेत, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडी सरकारचे यशस्वीपणे नेतृत्व करीत आहेत.
माजी आ. विजय औटी म्हणाले, दोन वर्षात तालुक्याची काय अवस्था झाली आहे हे तालुक्यातील लोक पाहत आहेत. ज्यांना तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली त्यांनी त्या संधीचे सोने न करता लोखंड केले आहे. दोन वर्षाच्या काळात मी बाहेर पडलो नाही, मात्र आता लोकांच्या अडीअडचणी व कामासाठी मला बाहेर पडायची वेळ आली आहे. के. के. रेंजचा प्रश्न, ढवळपुरी एमआयडीसीचा प्रश्न, तालुक्यातील रस्ते व पाण्याचा प्रश्न आदींमध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन संचालक दिले. मात्र शिवसेनेला महाविकास आघाडीत असतानाही संधी मिळाली नाही. तेव्हा आता आम्ही सुद्धा तालुक्यामध्ये सोईचे राजकारण करणार आहोत. आता आम्हाला घड्याळाला मतदान करण्यास सांगू नये. ज्याप्रमाणे आपण विधानसभेला बॅट घेतली होती. त्याप्रमाणे आम्हाला भलेही तलवार घ्यावी लागली तरी चालेल, असे माजी आ. औटी सर्वांसमोर म्हणाले.
ना. शंकरराव गडाख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात यावे अशी मागणीही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे औटी म्हणाले. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती काशिनाथ दाते, नगराध्यक्षा वर्षा नगरे आदींचीही यावेळी भाषणे झाली.
सकाळी जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते जामगाव रोडलगत असलेल्या नगरे स्मशान भूमी संरक्षक भिंतीच्या कामाचे तसेच लोणी रोड परिसरातील भूमीगत गटारीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
WSqKaTncsX