पाथर्डी । वीरभूमी - 24-Nov, 2021, 01:45 PM
जाहीरातीत दिसणारा राष्ट्रीय महामार्ग जसा सुंदर, डांबरी रस्ता, रस्ता दुभाजक, हिरवीगार झाडे, दिशा दर्शक फलक अशी छान कल्पना सामान्य माणसाच्या समोर येते. परंतु पाथर्डी तालुक्यातील सुमारे 400 निरपराध व निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला कल्याण-विशाखपट्टणम महामार्ग क्रमांक 61 मात्र याला अपवाद आहे.
मेहेकरी ते फुंदे टाकळी फाटा यादरम्यानच्या 55 कि.मी. अंतरातील हा महामार्ग मागील अनेक वर्षांपासून प्रवासी व वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे.
पाथर्डी तालुक्यातील या महामार्गाची दुरावस्था व नियमित घडणारे अपघातांवर महामार्ग प्रशासन वा ठेकेदाराच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. या आंदोलनात स्थानिक पुढार्यांपासून तालुका व जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त करत या महामार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून साकडे घातले. अनेक लोकप्रतिनिधी बदलले, ठेकेदार बदलले, महामार्गाचे अधिकारीही गेले परंतु आजतागायत या महामार्गाची दैना काही फिटेना.
या महामार्गाच्या अर्धवट कामामुळे मार्गावरच्या गावातील नागरिकांना,दुकानदारांना नेहमीचाच होत असलेला प्रचंड धुळीचा त्रास व प्रवाशांच्या पाचवीलाच पुजलेला खड्ड्यात आदळत-आपटत-रडतखडत करावा लागणारा प्रवास हे नेहमीचे सूत्र बदलण्यासाठी पाथर्डी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आता यावर इलाज शोधला गेला आहे.
स्थानिक व जिल्हा लोकप्रतिनिधींनी या महामार्गाच्या दुरावस्थे बाबत हतबलता व्यक्त केल्यामुळे मनसेच्या वतीने आता थेट केंद्रीय रस्ते - वाहतूक मंत्री खुद्द ना.नितींजी गडकरी यांनीच या जीवघेण्या महामार्गाच्या सापळ्यातून पाथर्डीकरांची सुटका करावी. यासाठी त्यांना साकडे घालत शहरातील वसंतराव नाईक चौकांमध्ये बुधवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शास्त्रोक्त व विधीवत पद्धतीने ना. गडकरी साहेबांची चरण पूजा या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावर अधिक माहिती देताना पाथर्डी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की, मेहकरी ते टाकळी फाटा पर्यंत हा नावालाच असलेला राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा. या महामार्गाचे मागील पाच वर्षापासून रखडलेले काम सुरु व्हावे हा महामार्ग महामृत्यु मार्ग न होता पाथर्डी तालुक्याच्या विकासाला गती देणारा मार्ग व्हावा.
पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे 400 निष्पाप प्रवाशांचा बळी गेला, त्यासाठी आता वेगळा उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही या महामार्गाचे अनिष्ठ दूर व्हावे यासाठी ना.नितीन गडकरी साहेबांचीच चरण- पूजा करण्याचे उपहासात्मक आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
चरण पूजा केल्याचे व महामार्गाचे फोटो ना. गडकरी साहेबांच्या ई-मेल, ट्विटर व व्हाट्सअप अकाउंट वर पाठवली जाणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पाथर्डी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केले आहे. तसे फलक शहरात लावले आहेत.
tVuIiRZsLe