प्रारुप मतदार याद्या जाहीर होताच निवडणूक कार्यक्रमाने इच्छुकांची धावपळ
मुंबई । वीरभूमी- 24-Nov, 2021, 08:43 PM
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, अकोले व शिर्डी नगरपंचायतीसाठी दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होत आहे. तर दि. 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे.
यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील वरील 4 नगरपंचायतीसह राज्यातील 105 नगरपंचायतीला नवीन वर्षात नवे कारभारी मिळणार आहेत. अनपेक्षित निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांची एकच भंबेरी उडणार हे मात्र निश्चित. या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी घोषणा केली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर, कर्जत व शिर्डी या नगरपंचायतींसाठी नुकतीच नव्याने प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यावरील हरकती निकाली काढल्यानंतर दि. 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत.
प्रारुप मतदार याद्या जाहीर होत नाही तोच आज बुधवार दि. 24 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर, कर्जत व शिर्डी या नगरपंचायतीसह राज्यातील 105 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जाहीर करणे 29 नोव्हेंबर 2021 तर 31 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. यानुसार बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 ते मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे व याच कालावधीत शनिवार दि. 4 व रविवार दि. 5 हे दोन सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र दाखल करणे.
बुधवार दि. 8 डिसेंबर 2021 रोजी दाखल अर्जाची छाननी, उमेदवार अर्ज मागे घेणे सोमवार दि. 13 डिसेंबर 2021 तर अपिल असलेले अर्ज माघारीसाठी गुरुवार दि. 16 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत असणार आहे. तर आवश्यक असल्यास मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर बुधवार दि. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
काल मंगळवार दि. 23 रोजी वरील नगरपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची एकच भंबेरी उडणार आहे.
NdJYfvGebTACDoZ