उद्या शेवगावात नोकरी मेळावा । नियोजनाची बैठक उत्साहात
शेवगाव । वीरभूमी- 27-Nov, 2021, 01:36 PM
स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी शेवगाव शहरात बेरोजगारांसाठी ‘नोकरी मेळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी नुकतीच बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
रविवारी स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने शेवगाव शहरात नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा शुभारंभ जनशक्ती मंचचे अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले, जिल्हा संघटक सूर्यकांत नेटके, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनील काकडे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याबाबत माहिती देतांना संस्थापक अध्यक्ष कृषिराज टकले म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी स्वाभिमानी मराठा संघटनेच्या वतीने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच चंद्रकांत महाराज लबडे हे दर शुक्रवारी शेवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालतात. आतापर्यंत 124 अभिषेक पूर्ण झाले आहेत. त्यांच्या या अखंड उपक्रमाची दखल घेऊन शासनाने चंद्रकांत महाराज लबडे यांना छत्रपती भूषण पुरस्कार देऊन सन्मान करावा, असे सांगितले.
स्वाभिमानी मराठा संघाचे तालुका कार्याध्यक्ष शरद थोटे यांनी सांगितले की, मराठा समाजा व्यतिरिक्त इतर समाजाचेही विविध उपक्रम हाती घेतले जातील. तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांना ही वाचा फोडली जाईल. यामध्ये कर्जमाफी, विज बिल माफी, वीजपुरवठा वारंवार खंडित करणे, अशा अडचणी सोडवण्याबाबत स्वाभिमानी मराठा संघाच्यावतीने पुढाकार घेतला जाईल.
या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी केले तर रोहित मोटकर यांनी आभार मानले. या नियोजन बैठकीला स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, जिल्हा संघटक किशोर पाटील, तालुका कार्याध्यक्ष रोहित मोटकर, तालुका युवा कार्याध्यक्ष शरद थोटे, प्रविण भिसे, युवक तालुका अध्यक्ष सतीश पवार, तालुका संघटक विजय मुरकुटे आदी उपस्थित होते.
Comments