अकोले । वीरभूमी- 27-Nov, 2021, 04:44 PM
अकोले नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीने सध्या तरी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. भाजपने आपले उमेदवार ठरविण्याच्या दृष्टीने रविवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उमेदवारांच्या मुलाखती व कार्यकर्ता बैठक भाजप पक्ष कार्यालयात आयोजित केली आहे.
या बैठकीला व मुलाखतीला माजीमंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हा संघटक नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, जि. प. सदस्य कैलासराव वाकचौरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अमृतसागर दुधसंघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ नेते अॅड. वसंतराव मनकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, प्रथम नगराध्यक्ष अॅड. के. डी. अण्णा धुमाळ, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, भाजप अकोले तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे उपस्थित राहणार आहेत.
या मुलखातीसाठी व बैठकीला इच्छुक उमेदवारांनी शिष्टमंडळासह सर्वांनी वेळेवर हजर राहावे व आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत असावेत, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, शहर अध्यक्ष सचिन शेटे, शहर सरचिटणीस हितेश कुंभार यांनी केले..
मनसेची नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या कार्यकर्त्यांची मीटिंग उद्या होणार असून मनसे कोणाबरोबर जाणार की, स्वबळावर निवडणूक लढविणार याचा निर्णय येत्या दोन दिवसात घेणार असल्याचे समजते.
तर महाविकास आघाडी बाबत अजून कोणताही निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था दिसत आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर जाणार की नाही, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
JGwdujYfsSXM