लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणार ः तहसीलदार विजय बोरूडे
कोपरगाव । वीरभूमी- 02-Dec, 2021, 02:06 PM
जिल्ह्यात कोपरगाव तालुका लसीकरण करण्यात दुसर्या नंबरवर असून लवकरच आपल्या सर्वांच्या सहकार्याने 100 टक्के लसीकरण पूर्ण करू असा विश्वास तहसीलदार विजय बोरुडे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात प्रथम क्रमांक संगमनेर तालुक्याचा असून लसीकरणाची टक्केवारी 78.15 इतकी आहे. तर दुसर्या क्रमांकावर कोपरगाव तालुका असून टक्केवारी 77 इतकी आहे. तालुक्यात घरोघरी जाऊन लस देण्याचे काम सुरू आहे.
तहसीलदार श्री. बोरुडे व आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक, सेविका व संबंधित अधिकारी गावोगावी भेट देऊन लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका वाड्या -वस्त्यावर जाऊन राहिलेल्या नागरिकांना समजावून सांगत लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेने चांगला वेग घेतलेला दिसून येत आहे.
तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून शहरात एक केंद्र आहे. तालुक्यात सर्वात लसीकरण वारी येथील आरोग्य केंद्रात सुमारे 99.18 टक्के इतके झाले आहे. तर सर्वांत कमी पोहेगाव आरोग्य केंद्रात 69.63 टक्के इतके झाले आहे. अजूनही काही गावामध्ये लसीकरण वेग वाढविणे गरजेचे असल्याचे व 100 टक्के लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन तहसीलदार श्री. बोरुडे यांनी जनतेला केले आहे.
तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रामध्ये झालेले लसीकरण - (कंसात दुसरा डोसची टक्केवारी) - चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र - 76.07 टक्के (21.13 टक्के), दहेगाव बोलका- 71.39 टक्के (25.94 टक्के), पोहेगाव- 69.69 टक्के (19.37 टक्के), संवत्सर- 79.42 टक्के (24.37 टक्के), टाकळी - 71.70 टक्के (21.40 टक्के), वारी- 99.18 टक्के (44.83 टक्के), कोपरगाव शहर- 81.12 टक्के (42.13 टक्के) असे लसीकरण झाले आहे.
Comments