किन्ही येथील घटना । ढवळपुरी येथील मेंढपाळांचे मोठे नुकसान
टाकळी ढोकेश्वर । वीरभूमी- 02-Dec, 2021, 02:29 PM
पारनेर तालुक्यात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे व थंडीमुळे धनगर बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ढवळपुरी येथुन किन्ही येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळाच्या तब्बल 70 मेंढ्या दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ढवळपुरी येथील बंडू सिदू कोळेकर, अंकुश भिमा कर्हे, बुधा बिरा कोळपे, बाबाजी कर्हे, बाबाजी टकले, सुभाष तांबे हे मेंढपाळ किन्ही येथे मेंढ्या चारण्यासाठी आले होते. दरम्यान बुधवारी अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे व वातावरणातील गारव्याने मेंढपाळ बांधवांच्या तब्बल 70 पेक्षा जास्त मेंढ्या मरण पावल्या आहेत.
सदर घटनेची माहिती शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी आमदार निलेश लंके व महसूल विभागास दिली असता आमदार निलेश लंके यांनी ताबडतोब संबंधित विभागास झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यानंतर महसूल विभागाने तात्काळ तलाठी देवराम पथवे, ग्रामसेवक संजय घोलप व पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. शेळके यांना घटनास्थळी पाठवुन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील, किन्हीचे उपसरपंच हरेराम खोडदे, ग्रामपंचायत सदस्य शरद व्यवहारे, मोहन मोढवे, किरण व्यवहारे आदी उपस्थित होते.
Comments