आरक्षणाअगोदरच मिरी-करंजी गट व गणात इच्छुकांची फिल्डींग
इच्छुकांची भाउ गर्दी । आरक्षण सोडतीनंतर ठरणार उमेदवार
करंजी । वीरभूमी- 02-Dec, 2021, 08:22 PM
पाथर्डी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने नेत्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. इच्छुक कार्यकर्ते सोशल मीडियावर आपणच कसे सर्वांत पुढे हे दाखवत असुन जोरदार फिल्डिंग लावून जोशात असल्याचे चित्र सध्या करंजी-मिरी गटांमध्ये दिसत आहे.पाथर्डी तालुक्यातील मिरी-करंजी गटावर कायमस्वरूपी शिवसेनेचे वर्चस्व होते व आजही आहे. मात्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य स्व. अनिल कराळे यांच्या मृत्यूने हा गट शिवसेना आपल्याकडेच ठेवणार की, गमावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीतही या गटामध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळणार आहे. करंजी गण आणि मिरी गणामध्ये अपक्षांची भाऊ गर्दी वाढणार नसली तरी उमेदवारीनंतर नाराजांची नाराजी काढण्याची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्य पातळीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आघाडी झाली नाहीतर मिरी गट आणि गणात चौरंगी लढत होईल असे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष स्वबळावर लढण्याची चर्चा असून भाजपही या मैदानात तयारीनिशी उतरणार आहे.
मिरी गटामध्ये आणि गणांमध्ये राजकीय उलथापालथ जोरदार होणार आहे. चारही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांना मोठी राजकीय कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. तर आज मिरी गटांमध्ये गवळी, वाघ यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. तर गणात अनेक बडे राजकीय नेते उतरत आहेत. त्यामुळे निवडणूक यावेळी चांगलीच लक्षवेधी ठरणार आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या अनिल कराळे यांनी बाजी मारली होती. या गटांमध्ये शिवसेनेने सततच आपला करिष्मा कायम ठेवलेला आहे. मिरी गट हा शिवसेनेकडून ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर सध्या शिवसेनेकडे असलेला हा गट शिवसेनेकडे ठेवण्यासाठी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी सक्रीय झाले आहेत.
मिरी गटातील दिग्गज मोहनराव पालवे व अनिल कराळे यांचे निधन झाल्याने सेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे या गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
मिरी-करंजी गटासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये वृध्देश्वर कारखान्याचे माजी संचालक चारुदत्त वाघ, माजी सभापती संभाजी पालवे, मिरी-तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांचे चिरंजीव श्रीकांत आटकर, स्व. अनिल कराळे यांच्या पत्नी उषाताई कराळे, जवखेडचे अमोल वाघ, मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, करंजीचे विद्यमान सरपंच माजी सभापती व पाथर्डी खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब आकोलकर, उद्धव गीते, वैभव खलाटे, विद्यमान पंचायत समीती सदस्य राहुल गवळी व प्रकाश शेलार आदी जिल्हा परिषदेसाठी इच्छूक आहेत.
करंजी गणासाठी शिराळचे सरपंच पिनू मुळे, रफिक शेख, बापू गोरे, जालिंदर वामन, अंबादास डमाळे, बंडू पाठक, भैय्या पाठक, नवनाथ आरोळे, संजय गोरे, मनसेचे महादेव दहिफळे, विवेक मोरे आदी पंचायत समितीसाठी इच्छूक आहेत.
मिरी गणासाठी राजू शेख, भागिनाथ गवळी, उध्दव दुसंग, सुभाष गवळी, जगदीश सोलाट, महेंद्र सोलाट, अरुण बनकर, सुभाष बर्डे, सुभाष लोंढे आणि अमोल गवळी आदी उमेदवार मिरी पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत.
गट आणि गणासाठी अनेकांनी उमेदवारीसाठी दावा केला असून पक्षनेतृत्वाकडे फिल्डींग लावली आहे. मात्र अद्याप आरक्षण सोडत झाली नसली तरी मतदारांच्या भेटीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीत गट महिला राखीव निघाल्यास आपल्याच कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरविण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. यामुळे सर्वाच्या नजरा सध्यातरी आरक्षण सोडतीकडे लागून राहील्या आहेत.
rdMWCBIj