कालवा सल्लागार समिती सदस्य घनश्याम शेलार यांनी दिली माहिती
श्रीगोंदा । वीरभूमी- 04-Dec, 2021, 11:11 PM
श्रीगोंदा तालुक्यासह कर्जत, जामखेड, करमाळा तालुक्यातील पिकांना जीवनवाहिनी ठरणार्या ठरणार्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 1 जानेवारी 2022 पासून सोडण्यात येणार असल्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या शनिवार दि. 4 रोजी पुणे येथील सिंचन भवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनःशाम शेलार यांनी दिली आहे.
कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील सिंचन भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन दि. 1 जानेवारी 2022 रोजी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनःशाम शेलार यांनी दिली.
शेलार यांनी सांगितले की, 42 ते 45 दिवसांचे असलेले हे आवर्तन टेल टू हेड या न्यायाने होणार आहे. सगळ्यात मोठी वितरीका 132 व वितरीका 12 खालील लाभक्षेत्रधारक शेतकर्यांवर नेहमी अन्याय होतो त्यामुळे या वितरीका पूर्ण क्षमतेने चालवून सर्व शेतकर्यांना न्याय मिळणार आहे.
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्यासह आ. रोहित पवार, आ. अशोक पवार, आ. अतुल बेनके, आ. संजय शिंदे, देवदत्त निकम, अशोक घोडके, सुदामराव पवार यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य व कुकडी प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता, सर्व अधिकारी उपस्थित होते.
कुकडी आवर्तनाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे विविध पक्षांच्या नेत्यांच्या नौटंकीला वेळीच आळा बसेल. नाहीतर लोकप्रिय आंदोलने, पत्रव्यवहार केलेले फोटो, मंत्र्यांच्या भेटीगाठी, विविध नेत्यांच्या समर्थकांचे सोशल मीडिया युद्ध काहीसे थंडावेल. शेतकर्यांमधून कुकडीच्या आवर्तनाची मागणी असतानाच अचानक आलेला अवकाळी पाऊस यामुळे झालेले विविध पिकांचे नुकसान पाहता शेतकरी हवालदिल झाला आहे. नेत्यांनी जरा नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाला करावी, ही बळीराजाची किमान अपेक्षा आहे.
KegEidYjBLcTrx