भगवानगड परिसर ४६ गावे पाणीपुरवठा योजनेला या दिवशी मिळणार कार्यारंभ
आ. मोनिका राजळे यांची पाणी पुरवठा मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय
पाथर्डी । वीरभूमी - 15-Dec, 2021, 04:13 PM
बहुचर्चीत व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भगवानगड परिसर ४६ गावे पाणी पुरवठा योजना मंजूर होणेसाठी आज मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीसाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सह पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री-शंकरराव गडाख, मंत्री-प्राजक्त तनपुरे सह शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, पाणी पुरवठा प्रधान सचिव संजीव जेस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सह सचिव अभिषेक कृष्णा, अधिक्षक अभियंता भामरे साहेब, उपस्थीत होते.
या बैठकीत भगवानगड व ४६ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी १५ जानेवारी पर्यंत टेंडर प्रसिध्द होवून २० फेब्रुवारी पर्यंत कार्यरंभ आदेश देवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
या योजनेमध्ये मोहटादेवी गड देवस्थान व तारकेश्वर गड देवस्थान यांचा समावेश करणेसाठी शेवगांव पाथर्डी आमदार मोनिकाताई राजळे व मंत्री शंकरराव गडाख यांनी सूचना केल्यानुसार हे दोन्ही तिर्थक्षेत्र या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याच्या सूचना मंत्री महोदय यांनी अधिकारी यांना दिल्या.
ही योजना सकारात्मक दृष्टया मंजूर केल्याबद्दल शेवगांव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्य उर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले.
तसेच लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन या योजनेच्या भूमिपूजनासाठी मला बोलवा मी नक्की येईल असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी असे आश्वासन आमदार मोनिकाताई राजळे यांना दिले. या वेळी येळीचे सरपंच संजय बडे हे ही उपस्थीत होते.
पाथर्डी तालुक्याचा पूर्व भाग हा अवर्षण प्रवण क्षेत्र भाग म्हणून ओळखला जातो. शेतीसह, पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी यासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे २०१७ साली माजी आमदार राजीव राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाथर्डी तालुक्याच्या पुर्व भागातील भगवानगड परिसरातील गावांसह टाकळीमानूर, चिंचपुर, मोहटा, येळी, भालगांव, मिडसांगवी, या परिसराच्या पाणी पुरवठयासाठी भगवानगड परिसर व ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री - बबनराव लोणीकर, पालकमंत्री राम शिंदे साहेब, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे १० मे २०१७ रोजी पत्राद्वारे मागणी करुन पाठपुरावा केला.
या योजनेच्या सर्वेक्षणासाठी सन २०१९ मध्ये रु. १९ लक्षचे निविदा प्रक्रिया झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना सदर योजनेचे सर्वेक्षण व DPR तयार करण्यासाठी सुचना दिल्या. परंतू सर्वेक्षण व्यवस्थापन, आराखडा तयार करण्यासाठी पुरेसा निधी मिळणेस विलंब होवून या योजनेचे काम संथ गतीने होत राहीले. मध्यंतरी सत्तांतर व लगेच कोरोना लॉकडाऊन मुळे कोणत्याच योजना मंजूर झाल्या नाही अथवा त्यांचे कामकाजही पुढे ढकलेले नाही.
जानेवारी २०२१ पासून आमदार मोनिका राजळे यांनी शासनाकडे पुन्हा भगवानगड व ४६ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला त्यासाठी त्या पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेकडे पाठपुरावा करुन या योजनेसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करुन पुढील कार्यवाही व्हावी, यासाठी प्रयत्न केले.
मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात याबाबत पाणी पुरवठा मंत्री यांनी बैठकही आयोजित केली. परंतू ती स्थगीत करुन पुढे ढकलण्यात आली. आज दि. १५ डिसेंबर रोजी ही बैठक मंत्रालयात पार पडली.
eowHhdgKcqjCnrML