अकोले । वीरभूमी- 15-Dec, 2021, 10:03 PM
अगस्तीला नारळ अर्पण करुन आघाडीचा प्रचार सुरु करत आहे. 22 तारखेला विजयाचा गुलाल घेऊन नारळ फोडू, असा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला.
अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ अगस्ती मंदिरात नारळ वाहून करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत आ. डॉ. किरण लहामटे बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सीताराम पा. गायकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, प्रा. सुरेश खांडगे, महेशराव नवले, अशोकराव देशमुख, प्रा. संपतराव नाईकवाडी, राष्ट्रवादी महीला अध्यक्षा स्वाती शेणकर, अमित नाईकवाडी, बाळासाहेब ताजणे, प्रमोद मंडलिक, रामहारी तिकांडे, माधव तिटमे, डॉ. मनोज मोरे उपस्थित होते.
यावेळी आमदार लहामटे म्हणाले की, ग्रामपंचायतची नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही काहीच फरक झाले नाहीत. शहराच्या विकासात काहीही झाले नाही. शहराच्या विकासासाठी निधीची गरज आहे. आपण विकास आराखडा तयार केला आहे. या मोठ्या निधीसाठी आपल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला निश्चित मदत करतील. त्यासाठी नगरपंचायतीवर विकास आघाडीची सत्ता आली पाहिजे.
सर्व कार्यकर्त्यांनी आता लोकांपर्यत जावून मतदान घडवले पाहिजे. यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा. आज नारळ अर्पण केला येत्या 22 तारखेला गुलाल आपलाच आहे. असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडी संदर्भात बोलताना म्हणाले की, लोकांना अपेक्षा होती महाविकास आघाडी व्हावी, जनमताचा रेटा होता. त्यामुळे आपणही चर्चेची दारे खुली ठेवली होती. परंतु आपल्याला गाफील ठेवून 6 तारखेलाच काहीनी अर्ज भरून टाकले त्यामुळे काँग्रेसनेच विश्वासघात केल्याचा आरोप केला.
यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम गायकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात नगरपंचायतीत विकास झाला नाही. आम्हीही त्यांच्याबरोबर होतो, परंतु त्यांना विकास करता आला नाही, याचे आपण साक्षीदार आहोत. तेव्हा आता आ. डॉ. किरण लहामटे यांच्यासारखा चांगला, कर्तबगार आमदार मिळाला आहे. तेव्हा राज्यात राष्ट्रवादी, शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. तेव्हा राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करुन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नगरपंचायतचा चेहरा मोहरा बदलून टाकु असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मच्छिंद्र धुमाळ म्हणाले की, काँग्रेसची छुपी युती होती. आमदारांना फक्त झुलवत ठेवण्याचे काम केले. आघाडी करताना दोन पाऊले मागे यावे लागते. मात्र काँग्रेसनेच राष्ट्रवादी -शिवसेनेला धोका दिला आहे. माघारीच्या दिवशी काही वार्डात शिवसेनेच्या काही जणांनी अर्ज ठेवले आहेत, अशांनी अजूनही वेळ आहे, आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या. अन्यथा बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
QmKLCrpSNIkgjysu