श्रीगोंदा । वीरभूमी- 15-Dec, 2021, 10:22 PM
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी एकूण 21 जागांसाठी तब्बल 100 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 17 पर्यंत असल्याने अजून उमेदवारांची मोठी संख्या होणार आहे.
बुधवारी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी समर्थकांसह मिरवणूक काढून अर्ज दाखल केले. तर विरोधी गटाचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिजाबापू शिंदे, भगवानराव पाचपुते यांनी कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केले.
श्रीगोंदा कारखान्याचे विद्यमान चेअरमन राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, केशवराव मगर, अण्णासाहेब शेलार, प्रेमराज भोईटे, अरुण पाचपुते, सुभाष शिंदे या दिग्गजांनी बुधवारी अर्ज दाखल केले.
राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली स्व. शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनलच्या बहुतेक निश्चित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राजेंद्र नागवडे यांच्याबरोबर मिरवणुकीत अनुराधा नागवडे, बाबासाहेब भोस, दीपक नागवडे, शुभांगी पोटे, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोईटे, आदेश नागवडे, राकेश पाचपुते, मनोहर दादा पोटे, स्मितल वाबळे व मोठ्या संख्येने सभासद व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नागवडे कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे बाहेर पडून केशवराव मगर यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेत रणशिंग फुंकले आहे. त्यांच्याबरोबर या ना त्या कारणाने राजेंद्र नागवडे यांच्याशी मतभेद असलेले नेते एकजुटीने मगर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
तर सत्ताधारी राजेंद्र नागवडे यांच्या संचालक मंडळात काही संचालक अनेकवेळा संधी मिळाली असल्याने त्यांना डावलून नवोदितांना संधी मिळण्यासाठी मोठी लॉबी कार्यरत झाली आहे. त्यामुळे दोन-तीन वेळा संचालक पद भोगलेल्या संचालकांना उमेदवारी मिळणे कठीण झाले आहे.
राजेंद्र नागवडे यांच्या जमेची बाजू म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. नव्हे तर बाबासाहेब भोस सर्व निर्णय घेताना आघाडीवर आहेत. तब्बल 19,841 सभासद बापूंच्या सहानुभूतीने राजेंद्र नागवडे यांना कल देतात का? विरोधी पॅनलचे केशवराव मगर यांच्या पारड्यात मते टाकतात हे येणारा काळच ठरविणार आहे.
oXVsNDjMnWFtP