सर्व्हेक्षण समितीला वस्तुनिष्ट माहिती देण्याचे आवाहन
तिसगाव । वीरभूमी - 17-Dec, 2021, 01:19 PM
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादी सर्व्हेक्षण केले जात आहे. हे सर्व्हेक्षण पंचायत समितीने नेमलेल्या समितीमार्फत केले जात असून ड यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्यांनी समितीला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणुन पंतप्रधान आवास योजनेअंर्गत सन 2014-15 ला सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी ‘ड’ यादीमध्ये नावे समाविष्ट असलेल्या कुटुंबाची पात्रता व अपात्रता पडताळणीसाठी पंचायत समितीच्यावतीने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, डॉ. जगदीश पालवे साहेब यांच्या मागदर्शनाने विस्ताराधिकारी दादासाहेब शेळके, विस्ताराधिकारी प्रशांत तोरवणे यांनी प्रधानमंत्री आवाज योजनेतील ‘ड’ यादीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी गावपातळीवर समितीची नेमणूक केली आहे.
कासार पिंपळगावसाठी नेमलेल्या समितीमध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांडेकर हे अध्यक्ष असून सचिव म्हणुन ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के तर सदस्य म्हणुन सेवा सोसायटीचे सचिव राम आठरे, देविदास केळकर, तलाठी रमण शिंपले, कृषी सहाय्यक श्री. कदम, अंगणवाडी सेविका रंजना सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष लवांडे, तुकाराम कांबळे, अशोक तिजोरे यांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादी सर्व्हेक्षणातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवार दि. 16 पासून ही समिती यादीमध्ये नाव समाविष्ट असणार्या कुटुंबाचे सर्व्हेक्षण करत आहे. यामध्ये वरिष्ठ पातळीवर ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सर्व्हे केला जात असून यामधून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
यामुळे कासार पिंपळगाव ग्रामपंचायत अतंर्गत प्रधानमंत्री आवास योजना ड यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी सध्या राहत असलेल्या ठिकाणचा फोटो काढण्यात येणार असून यादीमध्ये नाव असलेल्यांनी समितीला वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र कांडेकर व समिती सचिव प्रमोद म्हस्के यांनी केले आहे.
Comments