अकोले नगरपंचायतीसाठी 80.69 टक्के मतदान
अकोले नगरपंचायतीसाठी 13 प्रभागासाठी झाले मतदान । अनेक प्रभागात अटीतटीच्या लढती
अकोले । वीरभूमी - 22-Dec, 2021, 07:45 AM
अकोले प्रतिनिधी- विद्याचंद्र सातपुतेमो. 9404696305
अकोले नगरपंचायतसाठी आज 13 प्रभागातील 19 मतदान केद्रातील 10194 मतदारांपैकी 8226 मतदारांनी मतदान केले असुन एकुण 80.69 टक्के मतदान झाले आहे.
अनेक प्रभागात अटीतटीच्या लढती झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे निकालाची उत्सुकता लागून राहीली आहे. मात्र मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याने निकालासाठी महिनाभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अकोले नगरपंचायतीच्या 13 प्रभागातील मतदान आज शांततेत पार पडले. यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे व निवडणूक सहाय्यक अधिकारी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय व पोनि. मिथुन घुगे यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवून निवडणूक शांततेत पार पडली.
आज मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला काही वार्डात कमी वेगाने मात्र दुपार नंतर मतदानाला चांगली गर्दी झाली होती. अनेक प्रभागात अटीतटीच्या लढती होत असल्याचे चित्र होते. अकोले नगरपंचायतच्या 13 प्रभागातील एकुण 10194 मतदारांपैकी 8226 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने एकुण मतदान 80.69 टक्के मतदान झाले आहे.
यावेळी प्रभाग निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र. 1 - 762 पैकी 675 मतदान होऊन 88.58 टक्के.प्रभाग क्र. 2- 490 पैकी 423 मतदान होऊन 86.33 टक्के. प्रभाग क्र. 3- 1143 मतदरांपैकी 797 मतदान होऊन 69.72 टक्के.
प्रभाग क्र. 5- 1014 मतदारांपैकी 776 एकुण 76.52 टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. 6 - 934 मतदारांपैकी 688 मतदान होऊन 73.66 टक्के मतदान झाले.प्रभाग क्र. 7- 1008 मतदारांपैकी 780 मतदान होऊन 77.38 टक्के मतदान झाले.
प्रभाग क्र. 8- 1046 मतदारांपैकी 921 मतदान होऊन 80.04 टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. 9- 741 पैकी 567 मतदान झाल्याने एकुण 76.52 टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. 10- 423 पैकी 387 मतदान झाल्याने एकुण 91.49 टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. 12- एकुण 900 मतदारांपैकी 750 मतदान झाले. प्रभाग क्र. 15- 761 पैकी 618 मतदान झाल्याने 81.21 टक्के.
प्रभाग क्र. 16- 465 पैकी 389 मतदान होवून 83.66 टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. 17- 507 पैकी 455 मतदान होवून 89.74 टक्के मतदान झाले.
अशी आज 13 प्रभागातील 5277 पुरुष मतदारांपैकी 4 हजार 372 व 4 हजार 917 महिलां मतदारांपैकी 3 हजार 854 असे एकुण 10 हजार 194 मतदारांपैकी 8 हजार 226 मतदारांनी मतदान केले असल्याने 13 प्रभागातील एकुण 80.69 टक्के मतदान आज झाले आहे.
आज सकाळपासून उमेदवार व त्याचे प्रतिनिधी यांची लगबग सुरु होती तर तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते, आघाडीच्या उमेदवारांसाठी तर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार वैभवराव पिचड व भाजपाचे पदाधिकारी दिवसभर शहरातील प्रभागात ठाण मांडून बसलेली होती.
आता या 13 प्रभागातील सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असुन आता पुढील वर्षातील म्हणजेच 19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने आता मतमोजणीसाठी तब्बल 29 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
13 प्रभागांसाठी 19 मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक केंद्रावर एक प्रिसाय डिंग ऑफिसर, 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई आणि 1 पोलिस अशा प्रकारचा हा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला होता व त्यांच्यावर देखभाल करण्यासाठी तीन क्षेत्रीय अधिकार्यांची (झोनल ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली होती.
यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिस स्टेशन व बाहेरील पोलिस कर्मचारी असा मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
zEuBAlNdWLIhvj