अहमदनगर । वीरभूमी- 24-Dec, 2021, 09:53 PM
ओमायक्रॉनचा वाढता धोका विचारात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणुन विविध सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे, शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी दुकाने, विवाह सोहळे, मेळावे आदी ठिकाणी प्रवेश करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेला असवा. अशा ठिकाणी ‘नो व्हॅक्सीन नो एँट्री’ असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सहीने निघाले आहेत.
यामुळे आता जिल्ह्यात कुठेही जातांना कोरोना प्रतिबंध लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिनरित्या 40 ते 70 दरम्यान कोरोना बाधीत रुग्णसंख्या आढळून येत आहे. मात्र दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशात कोविड 19 विषाणुचा बी. 1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला आहे. त्याला जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ओमायक्रॉन हे नाव दिलेले आहे.
सदर नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा कोविड 19 विषाणुच्या पुर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आलेले आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. असे सर्व टास्क फोर्स तसेच आरोग्य विषयक तज्ञांकडून वारंवार सुचित करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सांगोपांग चर्चा करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत्वाने लसीकरण न झालेले नागरिक समुहात मिसळल्यास त्यांचे स्वतःचे आरोग्याचे दृष्टीने तसेच आजाराच्या प्रसाराच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरु शकतात.
ही बाब विचारात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश देतांना त्यांचे लसीकरणबाबत शहानिशा करणे अनिवार्य करुन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त रणेबाबत धोरण स्वीकारणेस दि. 24 रोजी झालेल्या बैठकीत सर्व संमतीने मान्यता देण्यात आलेली आहे.
यानुसार दि. 25 डिसेंबर 2021 पासून अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात ‘नो व्हॅक्सीन नो एँट्री’ या प्रमाणे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
वरील ठिकाणी प्रवेश करण्यासाठी किमान कोरोना प्रतिबंधक लसीचा एक अथवा दोन्ही डोस घेतलेले आवश्यक असणार आहे. तसेच प्रत्येकाने योग्य पद्धतीने मास्क लावून नेहमी नाक व तोंड मास्कने झाकलेले पाहिजे.
या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सहीने काढण्यात आले आहेत.
Comments