प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुदतबाह्य औषधे बाजारतळावर
कोपरगाव । वीरभूमी- 02-Jan, 2022, 10:44 PM
तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचार्यांनी मुदतबाह्य औषधे गावातील बाजारतळावर फेकून दिल्यामुळे या केंद्रातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाकडून लाखो रुपयांची औषधे दिली जातात. सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा हा एकमेव उद्देश असला, तरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे सर्व सामान्यांना न देता रस्त्यावर फेकल्यामुळे गावातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बाजारतळावर अक्षरश: शेकडो बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या असून लहान मुले त्या बाटल्यांचा वापर खेळण्यासाठी करत आहेत. लहान मुलांनी त्याचा गैरवापर केल्यास त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
मुदतबाह्य औषधे बाजार तळावर फेकून देण्यामध्ये काय उद्देश असेल, कोणत्याही प्रकारचा उद्देश असला तरी शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून नविन बांधलेल्या हा दवाखाना भविष्यात फक्त लस आणि डोस साठीच राहील की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
सरकार आरोग्य विभागावर कोट्यावधी रुपये खर्च करते, पण आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्याला त्याचा फायदा काय होतो की नाही हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. गावात सर्वत्र बोंबाबोंब झाल्यानंतर डॉक्टरांनी कर्मचार्यांना सर्व बाजार तळावरील बाटल्या गोळा करण्याचे फर्मान सोडले आहे.
कर्मचार्यांनी धावपळ करत फेकलेली मुदतबाह्य औषधे गोळा केली. परंतु मुदतबाह्य औषधे गोडाऊन मध्ये असतात. ती बाहेर गेलीच कशी? सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधे थोड्याफार प्रमाणात असतात. मात्र चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राने मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याची नवीन पद्धत शोधली असावी असे वाटते.
आरोग्य केंद्राचा आलेला निधी आणि झालेल्या खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी किती वर्षे काम करतात याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही.
यापूर्वी ही सदर आरोग्य केंद्राचा बोगस कारभार जनतेसमोर आलेला आहे. येथील वैद्यकीय अधिकार्याची बदली व्हावी म्हणून काही दिवसापूर्वी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्या ठरावाची अद्यापही जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी दखल घेतलेली नाही. ग्रामसभेच्या ठरावाला काही महत्व आहे की नाही. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आता तरी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेतील काय? अशी चर्चा गावकर्यांत सुरू आहे.
Comments