अहमदनगर । वीरभूमी- 07-Jan, 2022, 02:17 PM
मागील काही दिवसापासून आटोक्यात असलेला कोरोना बाधितांच्या आकडेवारीत बुधवार पासून मोठी वाढ होत आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात 170 कोरोना बाधित आढळले आहेत. सलग तिसर्या दिवशी कोरोना बाधितांच्या आकडेवाढीने हॅट्रीक केल्याने चिंता वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात कोरोना बाधित आढळण्याचा आकडा हा 50 च्या आत होता. मात्र या आठवड्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होऊ लागली आहे.
नगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत बुधवारी 115, गुरुवारी 156 तर आज शुक्रवारी 170 असे सलग तिसर्या दिवशी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढा झाली आहे. गेल्या तीन दिवसात 441 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या गुरुवार अखेर 563 वर पोहोचली असून आजही यामध्ये मोठी भर पडली आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरातील असून हा आकडा 59 एवढा आहे. तर दुसर्या स्थानी राहाता, तिसर्या स्थानी नगर ग्रामीणचा क्रमांक लागतो. मागील काही दिवसापासून शुन्यावर असलेल्या जामखेडमध्ये 8 तर मिलटरी हॉस्पिटलमध्ये 7 कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 44, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 85 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 41 असे एकुण 170 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 59, राहाता 17 नगर ग्रामीण 15, जामखेड 8, पाथर्डी 8, मिलटरी हॉस्पिटल 7, श्रीगोंदा 7, नेवासा 6, इतर जिल्हा 6, भिंगार 5, पारनेर 6, श्रीरामपूर 5, कोपरगाव 4, संगमनेर 4, अकोले 3, इतर राज्य 3, शेवगाव 3, कर्जत 2, राहुरी 2 असे कोरोना बाधित आढळून आले.
मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी दररोज शंभरच्या आत राहत होती. मात्र मागील तीन दिवसापासून एकुण आकडेवारीने शंभरी पार करत द्विशतक गाठण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments