त्या गैरप्रकारात तुमचाही सहभाग आहे काय?
अॅड. प्रताप ढाकणे यांचा आ. राजळे यांना सवाल
पाथर्डी । वीरभूमी - 09-Jan, 2022, 11:11 AM
सुमारे 120 कोटीच्या निधींची पालिकेने काय विल्हेवाट लावली. काय विकास कामे झाली याबाबत गेल्या पाच वर्षात आमदारांनी किती वेळा पालिकेत बैठक घेतली. गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता किंवा तुम्हाला त्याकडे बघायचे नाही.तुम्हीसुद्धा त्यात सहभागी आहात काय? असा सवाल शहरातील नागरिक आमदार या नात्याने विचारत आहेत. या मुद्द्यांवर जाहीर चर्चेचे आव्हान तुम्ही स्वीकारणार काय? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी विचारत आमदार मोनिका राजळेंवर तोफ डागली.
पालिका गैरप्रकाराच्या चौकशीच्या मुद्द्यांवरून ढाकणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे नेते भगवान दराडे, भाऊसाहेब धस, शहराध्यक्ष योगेश रासने, नगरसेवक बंडू बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, देवा पवार, बबलू शिरसाट, चंद्रकांत भापकर, नासिर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक बंडू बोरुडे म्हणाले, सभागृहात आम्ही वेळोवेळी आवाज उठवला. सत्तेपुढे आमचा आवाज दाबला गेला. खोलेश्वर निधी, जेसीबी घोटाळा, तीर्थक्षेत्र विकासनिधी आदीबाबत प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही. आरोग्याच्या ठेक्याची मुदत संपूनही वरच्या नेत्यांपासून अगदी आमदार पर्यंत यामध्ये इंटरेस्ट असल्याने नियमबाह्य पद्धतीने मुदत वाढवली.
पालिकेची कामे घेणार्या ठेकेदारांना आमदारांनी बोलवून प्रस्ताव मागे घ्यायला सांगितले. ठेकेदारांची रिंग पालिकेत असल्याने इतरांना कामे करू दिली जात नाहीत. कामाची देयके अडकवले जातात. बाहेरच्या ठेकेदाराला धमकावले जाते. आमदार, नगराध्यक्ष, सर्वजण दबाव आणतात. काही नगरसेवक ठेकेदारी करतात. पालिकेत एकही चांगला ठेकेदार निविदा देत नाही यामागचे रहस्य सांगण्याची गरज नाही. माहिती अधिकार आला सुद्धा केराची टोपली दाखवली जाते. काही कामात दोन नगरसेवक व नगराध्यक्ष पार्टनर आहेत. असा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले, पदाधिकार्यांच्या पाठीशी तुम्ही आहात तर तेथील गैरप्रकाराची सुद्धा जबाबदारी घ्या. भाजपच्या नावाने आमदारांनी मते मागितली. सुशिक्षित उमेदवार म्हणून लोकांनी मते दिली. पालिकेने लोकांना काय दिले. मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर तांत्रिक बाबीची पूर्तता नसताना हनुमान मंदिरा समोर शौचालयाचे भूमिपूजन करताना तुम्ही जराही विचार केला नाही. तुम्ही फोडलेल्या नारळांच्या विकासकामाचे काय झाले,
याकडे वळून पाहिले नाही. खुले नाट्यगृह, जॉगिंग पार्क, टेकडीवरील पाण्याची टाकी, अशा कामातील गैरप्रकारांची तुम्ही (आमदारांनी) जबाबदारी घेत नसाल तर तुमच्यावर विश्वास ठेवून मते दिलेल्या मतदारांचा सुद्धा विश्वास घात आहे. पालकमंत्र्यांपुढे पुराव्यानिशी तक्रारी दिल्या. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पडताळणी करून चौकशीचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले. यातूनही शहराला योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू.
झोपेचे सोंग घेणार्या आमदारांची झोप उडवावी लागेल. पालिकेला सुशिक्षित नगराध्यक्ष लाभला. आमदारांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासानंतर वा रे, कल्पना अन वा रे कारभार, असे म्हणण्याची लोकांवर वेळ आली आहे. आजपर्यंत गावात फिरताना तुम्हाला शहरात काहीच समस्या दिसल्या नाहीत काय? दिवाळीच्या सणा दरम्यान पिण्याला पाणी नव्हते.
पथदिवे, स्वच्छता, गटारींची कामे नाहीत, तरीही शहराबद्दल फार पुळका दाखवत तुम्ही नारळे फोडता. कुठे तरी नागरिकांना वाटते तुम्ही सुद्धा यात सामील आहात. विद्यमान नगराध्यक्षांच्या वार्डात लोकवर्गणी करून नागरिकांकडून पाईप टाकले जात आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. याचा सर्व स्तरावर जाब विचारू, असे ढाकणे म्हणाले.
QTUIgOMbSqEZocKa