वांगदरी-काष्टी गावानेच राखले नागवडे कारखान्यावर वर्चस्व
नागवडे कारखाना निवडणूक काष्टी गट
विजय उंडे । वीरभूमी- 10-Jan, 2022, 09:27 AM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीच्या किनारी वसलेल्या बागायती व घोड प्रकल्पाच्या सिंचनामुळे सुजलाम सुफलाम् असलेल्या श्रीमंत गावांमध्ये काष्टी, वांगदरी गावांचा समावेश होतो. या दोन्ही गावात टाचणी जरी पडली तरी त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटतात.आजपर्यंतच्या इतिहासात याच गावांच्या प्रमुखांनी तालुक्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवून तालुक्याचे नेतृत्व केले आहे. नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक सभासद 3,699 मतदार असलेल्या काष्टी गटाच्या निर्णयावर सत्तेचे सहकारातील निवडणुकीचे समीकरण अवलंबून असते. याच काष्टी येथे आशिया खंडातील सर्वाधिक उलाढालीची सेवा संस्था असून तालुक्याच्या राजकारणात काष्टी व वांगदरीचा कायमच रूतबा आहे.
कधी नव्हे ते अत्यंत चुरशीच्या नागवडे कारखाना निवडणुकीत कारखान्याचे हृदय असलेल्या काष्टी गटात विद्यमान चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी व्हा. चेअरमन भगवानराव पाचपुते, राकेश पाचपुते व वैभव पाचपुते रणांगणात उतरले आहेत.
बेलवंडी येथील डहाणूकर यांचा खाजगी कारखाना विकत घेऊन मढेवडगावचे खासेराव वाबळे यांनी सहकार्यांना बरोबर घेत राज्यातील नेते एकनाथ निंबाळकर व बाबुराव तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 1965 साली श्रीगोंदा कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. कारखाना हितासाठी खासेराव वाबळे यांनी तालुक्याबाहेरील राज्यातील नेते-मंत्री निंबाळकर व तनपुरे यांना चेअरमन- व्हा.चेअरमनपद देऊन ढोकराईच्या माळावर कारखान्याची उभारणी केली.
सार्वत्रिक निवडणुकीआधी मुख्य प्रवर्तक म्हणून पाच वर्षे व्हा.चेअरमन-चेअरमन राहिलेल्या गांधीवादी वाबळे यांनी राजकारणातील बदलत्या प्रवृत्तीमुळे राजकीय संन्यास घेतला.
1970 साली कारखान्याच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वांगदरी गावचे सुपुत्र व कारखाना संस्थापक सदस्य असलेल्या शिवाजीराव नागवडे व काष्टी येथील शिवराम पाचपुते यांनी पॅनल करून कारखाना सत्ता हस्तगत केली.कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ चेअरमन म्हणून शिवाजीराव नागवडे यांनी कारभार केला तर चौदा वर्षे व्हा. चेअरमन म्हणून शिवराम आण्णा पाचपुते यांनी त्यांना खंबीर साथ दिली.
आज दोन्ही नेते दिवंगत झाले आहेत. परंतु त्यांच्याच वारसांकडे कारखान्याची सूत्रे आली आहेत. बापूंचे वारसदार राजेंद्र नागवडे कारखान्याचे नेतृत्व करत आहेत तर शिवराम पाचपुते यांची तिसरी पिढी राकेश पाचपुते रणांगणात नागवडे यांना साथ देण्यासाठी उतरली आहे.
1978 साली पहिल्यांदा नागवडे यांच्या खानदानी राजकारणाला पर्याय म्हणून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने बबनराव पाचपुते यांना आमदार केले. पाचपुते यांनी नागवडे यांच्या मक्तेदारीला सुरुंग लावत 1984 साली श्रीगोंदा कारखाना ताब्यात घेतला. परंतु सहकारातील मुरब्बी नेते शिवाजीराव नागवडे यांनी काही महिन्यांतच त्यांना नामधारी बनवले व आजतागायत नागवडे यांची सत्ता अबाधित ठेवली.
शिवराम आण्णा यांच्याशी काही काळ बिनसल्याने नागवडे यांनी त्यांना पर्याय म्हणून भगवान पाचपुते यांना संधी दिली. सलग दहा वर्षे व्हा. चेअरमनपद भोगलेले भगवानराव बापूंच्या विरोधात जाऊन बबनराव पाचपुते यांची साथ धरली. आज ते राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात केशवराव मगर यांच्या पॅनलमध्ये पुन्हा एकदा दंड थोपटून उभे आहेत.
नागवडे विरुद्ध आजपर्यंतच्या व्हा.चेअरमन एकीपॅनल मध्ये खरी लढत आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. नव्याने राजकारणात उदयास आलेले व बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते यांनी भावकीला साथ देत नागवडे यांच्या विरोधात उमेदवारी केली आहे.
गावनिहाय मतदार सभासद संख्या वांगदरी 1041, काष्टी 1642, निमगावखलू 468, शिरसगाव बोडखा 106, सांगवी 443 आहेत. काहीही झाले तरी काष्टी व वांगदरी हीच दोन गावे येत्या 14 तारखेला कारखान्याचा कारभारी ठरवणार आहेत.
gkzJBeRrHVlAUSqs