‘त्या’ फरार आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळल्या
कर्जत पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल
कर्जत । वीरभूमी- 10-Jan, 2022, 03:45 PM
कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीस आमिष दाखवत फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली होती. याबाबत पीडित मुलीच्या भावाने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद देखील नोंदविली होती. सदर आरोपीवर 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी कुळधरण (ता.कर्जत) येथे मुलीसोबत आला असता त्यास कर्जत पोलिसांनी अटक केली.मात्र त्या अल्पवयीन मुलीवर आरोपीचा दबाव असल्यामुळे आपल्यावर अत्याचार झाला नसल्याचे सांगितल्याने न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला होता. दि. 29 डिसेंबर रोजी पुन्हा पिडीतेने सदर मुलाने आपल्यावर दौंड येथे दोन-तीन इच्छा नसताना अत्याचार केला असल्याचा जबाब दिल्याने त्या फरार आरोपीस पुन्हा अटक करण्याची यशस्वी कारवाई कर्जत पोलिसांनी पार पाडली.
याबाबत कर्जत पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश चंद्रकांत वगरे (रा. गलांडवाडी) याने एका अल्पवयीन मुलीस आमिष दाखवत फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली होती. याबाबत पीडितेच्या भावाने त्याची रीतसर फिर्याद कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या गुुन्हयाचा तपास पोलीस नाईक प्रवीण अंधारे करीत होते. सदर आरोपी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीसोबत कुळधरण (ता. कर्जत) येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यास मुलीसोबत कर्जत पोलीसांनी ताब्यात घेतले.
मात्र मुलीवर आरोपीचा दबाव असल्याने सदर पीडितेने आपल्या अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनतर अल्पवयीन असलेल्या मुलीस अहमदनगर बालकल्याण समिती यांच्यासमोर हजर करण्यात आले असता तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला. आरोपीला अटक करून कर्जतच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती.
मात्र दि.29 डिसेंबर 2021 रोजी पुन्हा तीच पीडिताने पोलिसांसमोर जबाब दिला की, आरोपीने मला पळवून नेऊन दौंड येथील खोली भाड्याने घेऊन तिच्यावर दोन ते तीन वेळा इच्छा नसताना बलात्कार केला आहे. पीडितेच्या या जबाबाने नमूद गुन्ह्यात भादवी कलम 376(2)(आय)(जे)(एन),376(3) बा.लै.अ.सं कायदा (पोस्को) 2012 कलम 3,4,5 (एल) व 6 प्रमाणे वाढीव कलम लागल्याने सदरचा तपास स.पो.नि.सतिष गावीत यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
आरोपीचा न्यायालयात जामीन झाल्याने त्यास पुन्हा अटक करुन त्याची कोठडी घेण्याचे मोठे आव्हान कर्जत पोलीसांसमोर उभे होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सतिष गावीत, रायटर पो.कॉ.संतोष फुंदे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या न्यायालयात रिपोर्ट देवुन आरोपीचा जामीन रद्द करुन घेतला व संबंधित गुन्हा हा ‘पोक्सो’ कलमांतर्गत असल्याने तातडीने श्रीगोंद्याच्या विशेष न्यायदंडाधिकारी जिल्हा व सत्र न्यायालयाची आरोपीस तपासकामी पुन्हा ताब्यात घेण्याची परवानगी मिळवली.
आरोपी हा फरार असल्याने पोलिसांपुढे आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याचे आव्हान होते. पोलिसांनी सतर्क होत आरोपीचा कसून शोध सुरू असताना आरोपी हा त्याचे वास्तव्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत होता. आरोपी हा श्रीगोंदा येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सतिष गावीत, पो.कॉ.संतोष फुंदे, चा.पो.कॉ.बेग यांनी श्रीगोंदा येथे शिताफीने आपल्या ताब्यात घेत त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
wnALZXyeosurCjWS