बिगर सिंचन आरक्षण वाढल्याने शेती व्यवसाय धोक्यात
गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी कधी मिळणार?
किरणकुमार आवारे । वीरभूमी- 11-Jan, 2022, 10:36 AM
भाग ः 1-नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, येवला तर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता तालुक्यांना सुजलाम सुफलाम करणारे गोदावरी कालवे सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांना हक्काचे 11 टीएमसी पाणी मिळेनासे झाले आहे.
त्यातच समन्यायी कायद्यामुळे गोदावरी कालवे आठमाही झाले आहेत. त्यामुळे गोदावरी खोर्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध न केल्यास ही कालवे लवकरच ओस पडणार आहेत. पर्जन्यछायेखाली असलेल्या या भागाचे इंग्रजांनी नंदनवन केले. मात्र आपले म्हणवणारे राजकीय नेतृत्व या भागाचे वाळवंट करत आहेत. त्यामुळे गोदावरी खोर्यातील शेतकर्यांनी आगामी धोका लक्षात घेऊन वेळीच जागृत होणे गरजेचे आहे.
इंग्रजांच्या दूरदृष्टीतून इ.स.1915/16 मध्ये दारणा धरणाची निर्मिती झाली. यामुळे या धरणाच्या निर्मितीतून केवळ नाशिक व नगर जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था इंग्रजांच्या डोळ्यासमोर होती. कालौघात नाशिक शहर विस्तारत गेले. नाशिकचा औद्योगिक विकास वाढत गेला. पर्यायाने पाण्याची मागणी वाढत गेली. नंतरच्या काळात पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे गंगापूर, मुकणे आदी धरणांची निर्मितीही झाली. मात्र वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे ही धरणे अपुरी पडू लागली.
आज सर्वच धरणांवरील पाण्याचे आरक्षण पाहता बिगर सिंचनाचे आरक्षण तब्बल 70 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर धरणांची साठवण क्षमता ही गाळामुळे निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे गोदावरी खोर्यातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. ही गंभीर परिस्थिती ओळखून गोदावरी खोर्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वैतरणा नदीचे समुद्रात वाया जाणारे पाणी गोदावरी खोर्यात वळविल्यास गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम होईल यात तिळमात्र शंका नाही.
गोदावरी खोर्यातील पाणी परिस्थितीकडे पाहिल्यास, प्रकल्प अहवालाचे अवलोकन केल्यास गोदावरी खोर्यातील पाणीप्रश्नाची गंभीरता लक्षात येते. शेतकर्यांना शेतीचेच पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गोदावरी खोर्यातील दारणा उपखोर्यात इगतपुरी येथे दारणा नदीवर इंग्रजांच्या काळात सन 1915/16 मध्ये 7763 द.ल.घ.फूट क्षमतेचे दारणा धरण बांधण्यात आले.
धरणापासून 76 कि.मी.अंतरावर गोदावरी नदीवर नांदूरमधमेश्वर येथे उंचावनीचा (डायव्हर्ट डॅम) बंधारा बांधण्यात आला असून त्यापासून गोदावरी उजवा कालवा 110 कि.मी.व डावा कालवा 90 कि.मी.असे दोन कालवे काढण्यात येऊन निफाड, येवला, सिन्नर, कोपरगाव व राहाता या तालुक्यांना या कालव्यांद्वारे 25870 हेक्टर क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली. या पाण्यावर बारमाही ब्लॉक, फळबागा, द्विहंगामी ब्लॉक देऊन पाण्याची हमी देण्यात आली. त्यामुळे या तालुक्यांमध्ये ऊस क्षेत्र वाढल्याने खाजगी व सहकारी साखर कारखानदारी या परिसरात फोफावली.
स्वातंत्र्यानंतर दारणेपासून मिळणारे पाणी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात कमी पडू लागल्याने इ.स. 1954 मध्ये गोदावरी नदीवर गंगापूर येथे 5500 द.ल.घ.फूट क्षमतेचे गंगापूर धरण टप्पा क्र.1 बांधले गेले. या बंधार्यामुळे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्याने धरणापासून 245 क्यूसेस वहन समतेचा 39 कि.मी.लांबीचा नाशिक डावा कालवा काढण्यात आला.
नाशिक डावा तट कालवा 10 हजार हेक्टर, गोदावरी कालवे 25 हजार 870 हेक्टर तर गोदावरी उजव्या कालव्याच्या वाढीव क्षेत्रासाठी 730 हेक्टर असे नियोजन होते. साधारणपणे बहुसंख्य शेतकर्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी या हेतूनेच तिसर्या पंचवार्षिक योजनेपासून नवनवीन पाटबंधारे प्रकल्प हाती घेण्यात आले.
इ.स.1963 मध्ये गंगापूर धरणाच्या सांडव्यातून वक्र दरवाजे बसवून धरणाची क्षमता 5500 द.ल.घ.फूटावरून 7200 द.ल.घ.फूट करण्यात आली. त्यावेळी नाशिक डावा कालवा (पहिला टप्पा) 3150 द.ल.घ.फूट, नाशिक डावा कालवा (दुसरा टप्पा) 1000 द.ल.घ.फूट, नाशिक उजवा कालवा (अतिरिक्त) 700 द.ल.घ.फूट, गोदावरी कालवे 1210 द.ल.घ.फूट, नाशिक नगरपालिका 100 द.ल.घ.फूट, धरणातील 629 द.ल.घ.फूट, के.टी.वेअर 410 द.ल.घ.फूट असे नियोजन होते.
टप्पा क्रं.2 मध्ये नाशिक डावा कालवा 12190 हेक्टर, नाशिक उजवा कालवा 3770 असे एकूण 15690 हेक्टर तर गोदावरी कालव्यांना 33170 हेक्टर असा वाटा होता. प्रकल्प अहवालानुसार दारणा व गंगापूर धरणांतून नांदूरमधमेश्वर बंधार्यापर्यंत दारणा धरण 7763 द.ल.घ.फूट, गंगापूर धरण 7200द.ल.घ.फूट, नांदूरमधमेश्वर बंधारा 1070 द.ल.घ.फूट, मान्सूनोत्तर प्रवाह 1000 द.ल.घ.फूट अशी एकूण 17033 द.ल.घ.फूट पाणी उपलब्ध झाले.
मात्र प्रकल्प अहवालानुसार गोदावरी कालव्यांना सिंचन समतेसाठी रब्बी हंगामासाठी 12815 द.ल.घ.फूट तर उन्हाळी हंगामासाठी 5464 द.ल.घ.फूट अशी 17279 द.ल.घ.फूट पाण्याची आवश्यकता असताना मुळातच सिंचनासाठी 9245 द.ल.घ.फूट पाण्याची उपलब्धी कमी आहे. गंगापूर धरणाच्या दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 1210 द.ल.घ.फूट पाणी प्रवाहने थेट धरणातून व नाशिक कालव्याच्या पाझराद्वारे 970 द.ल.घ.फूट असे 2 हजार 180 द.ल.घ.फूट पाणी गोदावरी कालव्यांसाठी धरले आहे.
मात्र इ.स. 1976/77 मध्ये गोदावरी कालव्यांना 11 हजार 336 द.ल.घ.फूट म्हणजे 73 टक्के, इ.स.1985/86 मध्ये 8552 द.ल.घ.फूट म्हणजे 51 टक्के, इ.स.1991/92 सालात द.ल.घ.फूट म्हणजे 45 टक्केच पाणी उपलब्ध झाले. या पाण्यात दिवसेंदिवस तीव्रतेने घट होत असल्याने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त होत आहे.
(क्रमशः)
Comments