माजी सरपंच रामजी अंधारे यांचा इशारा । बोधेगाव जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या प्रकरण
बोधेगाव । वीरभूमी - 11-Jan, 2022, 05:21 PM
जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे बांधकाम विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून खासगी मालकीच्या जागेत केल्याप्रकरणी विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांचे निलंबन करण्यात आले. मात्र या प्रकरणातील इतर दोषींवर कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी दिला आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्यानंतर त्या विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून इतरत्र खाजगी मालकीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते. त्याबाबत बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांचा झालेला खर्च वाया गेेला. अंधारे यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी तत्कालिन प्रभारी गटशिक्षण अधिकारी तथा शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ कराड आणि केंद्रप्रमुख रामराव ढाकणे यांचे तात्पुरते निलंबन केले.
या दोन्ही अधिकार्यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांचे मुख्यालय हे नेवासा तालुका करण्यात आले आहे. या घटनेने शेवगाव तालुक्यास जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मात्र जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्ग खोल्याच्या अनधिकृत जागेतील बांधकामासंदर्भात दोषीवर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागातील दोन अधिकार्यांवर कारवाई केली. मात्र जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसेवक, इंजिनिअर व पदाधिकारी यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.
तरी या इतर दोषींवरही जिल्हा परिषदेने कारवाई करावी. अन्यथा दि. 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ करण्याचा इशारा बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी दिला आहे.
दरम्यान अनधिकृत जागेतील शाळा वर्ग खोल्यासंदर्भात संबधित ग्रामसेवक, इंजिनिअर यांच्या संदर्भातील अहवाल येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले.
यामुळे शिक्षण विभागातील अधिकार्यांनंतर ग्रामसेवक, इंजिनियर यांच्यावर कधी कारवाई होणार, याकडे लक्ष लागून राहीले आहे.
Comments