कळसुबाई शिखरावरील मंदिर जीर्णोद्धार व तेथे सुविधा उपलब्धतेसाठी केले आंदोलन
अकोले । वीरभूमी - 17-Jan, 2022, 12:47 PM
कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच तेथे येणार्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे, या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या 91 वर्षाच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालया समोर तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण वनखात्याच्या लेखी आश्वासनानंतर अखेर आज सायंकाळी मागे घेण्यात आले.
अकोले तहसील कार्यालय समोर शुक्रवार पासुन 91 वर्षीच्या हौसाबाई नाईकवाडी यांनी कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार व अन्य प्रश्नी बेमुदत उपोषण सुरू केले होते. पहिले दोन दिवस वनविभागाच्या अधिकार्यांचे उपोषण सोडविण्यासाठीचे प्रयत्न निष्पळ ठरले. काल रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषणास बसलेल्या वयोवृद्ध हौसाबाई नाईकवाडी यांची आ. किरण लहामटे,अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम, तहसीलदार सतिष थेटे, राजूर वन परीक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी भेट घेऊन मागण्या संदर्भात चर्चा केली.
आ.डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, कळसूबाई शिखरावरील मंदिर परिसर जिर्णोध्दार करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असुन भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.
आ. डॉ. लहामटे यांनी त्यांना नारळ पाणी दिल्याने अखेर काल तिसर्या दिवशी त्यांनी आपले उपोषण सोडले.तर तहसिलदार थेटे यांनीही श्रीमती नाईकवाडी यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे कि, आपले वय लक्षात घेता आपल्या उपोषणातील मागणी वरिष्ठ कार्यालयाच्या अधिनस्त असल्याने आम्ही संबधीत कार्यालयाशी संर्पकात राहुन नियमानुसार योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करण्याची दक्षता घेत आहोत.
यावेळी ह.भ.प.तुकाराम महाराज जाधव, राम तळेकर, शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी काकड, प्रा. बादशहा ताजणे, ह.भ.प. शांताराम पापळ, बाळासाहेब भांगरे आदी उपस्थित होते.
Comments