बोधेगाव । वीरभूमी- 18-Jan, 2022, 01:34 PM
शेवगाव तालुक्यताील बोधेगावच्या मध्यवस्तीत असणार्या शासनमान्य देशी दारूचे दुकान हे इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करावे. तसेच या देशी दारूच्या दुकानामुळे परिसरात तसेच दुकाना शेजारील राहणार्या कुटुंबाला दारू पिणार्या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासन मान्य देशी दारूचे दुकान हे इतरत्र स्थलांतरीत करावे, असा ठराव मुस्लिम समाजाचे नेते तसेच बोधेगाव ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मांडला. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
याबाबत फिरोजभाई म्हणाले की, बोधेगाव येथील सदरील शासनमान्य देशी दारूचे दुकान हे गावाच्या मध्यवस्तीत असल्याने शाळकरी विद्यार्थी तसेच महिला वर्गांना आणि दुकाना शेजारी राहणार्या कुटुंबातील महिलांना या दुकानाचा तसेच मद्यपी यांचा फार त्रास सहन करावा लागत आहे. गावातील दारू दुकानांच्या बाजूलाच तळीरामांचा होणारा घोळका, जवळुन जाणारे-येणारे शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध मंडळी, महिलांना होणारा मद्यपींचा त्रास, मद्यपीकडून नशेत होणारा गोंधळ, छेडछाड, मारहाणीचे प्रकार यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही नेहमीच निर्माण होतात.
मद्यपींकडून छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी वादंग तसेच बीभत्स वर्तन करणे. यासह आदी सर्व बाबी लक्षात घेता गावच्या मध्यवस्तीत असलेले शासन मान्य देशी दारूचे दुकान हे इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करून गावकुसाबाहेर नेण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. अशा मागणीचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी मांडला.
तसेच बोधेगावच्या भरवस्तीत असणार्या शासन मान्य दारूच्या दुकानाचे स्थलांतर न झाल्यास लवकरच या विरोधात तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा देखील पठाण यांच्याकडुन देण्यात आला आहे.
देशी दारूची चोरट्या मार्गाने खुले आम वाहतूक-
या भागातील देशी दारू दुकानदारही आपल्या हस्तकामार्फत बेकायदेशीरपणे खेडोपाडी देशी दारूचे बॉक्स विक्री करीत आहेत. यामधून गोरगरीब, नवयुवक, मजूर आदीचे आयुष्य या देशी दारूमुळे उध्वस्त होत आहे. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही देशी दारूची वाहतूक करणारे चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करून सुसाट वाहने चालवून वाहतूक करतात. त्यामुळे अनेक वेळा या भागात छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याची देखील प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो बंदोबस्त करून कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
याबाबत दारुबंदी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अमोल घोलप म्हणाले की, बोधेगाव ग्रामस्थांकडून लोकवस्तीत असलेली देशी दारूचे दुकान गावाबाहेर हलवण्यात यावे म्हणुन ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन असून राज्य उत्पादन शुल्क विभागातंर्गत बोधेगावातील दारूचे दुकान लवकरात लवकर गावाबाहेर हलविण्यात यावे. अन्यथा दारूबंदी अंदोलन समिती तर्फे कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
diDLaGTCvPqYlZME