अटीतटीच्या लढती । प्रभाग 13 मध्ये सर्वाधिक 85.20 टक्के मतदान
अकोले । वीरभूमी- 18-Jan, 2022, 10:43 PM
अकोले नगरपंचायतीसाठी आज 4 प्रभागातील 5 मतदान केंद्रातील 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदान केले असुन एकुण 80.52 टक्के मतदान झाले आहे.
अकोले नगरपंचायतीच्या उर्वरित 4 प्रभागातील मतदान आज शांततेत पार पडले. यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री उदय किसवे व निवडणूक सहाय्यक अधिकारी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय व पो.नि. मिथुन घुगे यांनी पोलिस बंदोबस्त चोखपणे ठेवून निवडणूक शांततेत पार पडली.
आज मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली सुरूवातीला काही वार्डात कमी वेगाने मात्र दुपार नंतर मतदानासाठी चांगली गर्दी झाली होती. अनेक प्रभागात अटीतटीच्या लढती होत असल्याचे चित्र होते. अकोले नगरपंचायतच्या 4 प्रभागातील एकुण 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रभाग निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र. 4 - 817 पैकी 623 (76.25 टक्के), प्रभाग क्र. 11 - 802 पैकी 651 (81.17 टक्के), प्रभाग क्र. 13 - 635 पैकी 541 (85.20 टक्के), प्रभाग क्र. 14 - 883 पैकी 711 (80.52 टक्के) असे मतदान झाले.
आज सकाळपासून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची लगभग सुरु होती. तर तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मच्छिंद्र धुमाळ, नितीन नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते हे आघाडीच्या उमेदवारांसाठी तर भाजपाचे माजी आमदार वैभवराव पिचड व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सह, आरपीआयचे चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे व पदाधिकारी कार्यकर्ते दिवसभर शहरातील प्रभागात ठाण मांडून बसलेली होते.
आता अकोले नगरपंचायतच्या 17 प्रभागातील सर्व 57 उमेदवारांचे मतदान मतपेटीत (मशिन मध्ये) बंद झाले असुन आता उद्या दि. 19 जानेवारी रोजी सर्व प्रभागाची एकत्रित मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. दोन टप्प्यात मतदान झाल्याने काय निकाल लागतो याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मतमोजणी 9 टेबलावर 3 फेर्यात पूर्ण होणार आहे. साधारणपणे 12 वाजेपर्यंत मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ही नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात असून या निवडणुकीवर पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले असल्याचे चित्र दिसत होते.
WIcpTjamoADQb