अकोले नगरपंचायतीवर पुन्हा पिचड पिता-पुत्रांचेच वर्चस्व
प्रथमच भाजपाचा झेंडा फडकला । राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीसह काँग्रेसचा धुव्वा
अकोले । वीरभूमी- 19-Jan, 2022, 03:15 PM
विविध राजकीय घडामोडी, विकास कामे, आरोप-प्रत्यारोप आणि महाविकास आघाडीचा तुटलेला संसार अशा नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या अकोले नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा पिचड पिता-पुत्रांनी बाजी मारली. यामुळे अकोले नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे.निवडणुकीत भाजपाने विद्यमान आ. किरण लहामटे यांच्या राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला धुळ चारत तब्बल 12 जागा पटकाविल्या आहेत. तर आघाडीतील या दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा बोलबाला असताना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
ओबीसी आरक्षीत चार जागांसाठी महिनाभर लांबलेल्या अकोले नगरपंचायतीच्या राहीलेल्या जागांवर काल मतदान झाल्यानंतर आज एकूण 17 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात आली. या प्रक्रीयेत सुरुवातीपासून माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाने वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले.
या विजयाने अकोले नगरपंचायतीवर आपला गड शाबूत ठेवण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले असून या निवडणुकांचे निकाल माजी आमदार व स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे दिसत आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, खा.सदाशिव लोखंडे, संगमनेर च्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आदींनी अकोले नगरपंचायत आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी प्रचार सभा घेतल्या. मात्र महाविकास आघाडी व राष्ट्रवादीचे आमदार असताना अकोलेकरांनी फक्त अडीच वर्षातच नाकरल्याचे स्पष्ट झाले आहे. 40 वर्षे काय केले ही टीका या निवडणुकीत मतदारांना मानवली नाही.
उलट राज्यात सत्ता असताना अडीच वर्षात काहीच करता आले नाही. याचा रोष जनतेत दिसून आला. विशेष म्हणजे दुसर्या टप्प्यात प्रचार अति शिगेला पोहोचला असताना चारही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेला 4 जागा पैकी 2 जागा मिळाल्या. एका जागेचा फायदा त्यांना झाला.
आज सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेच्या विमल संतु मंडलिक (416) यांनी काँग्रेसच्या अलका अशोक मंडलिक (245) यांचा 171 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार सुरेखा पूंजा मंडलिक यांना केवळ 10 मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपाच्या सागर निवृत्ती चौधरी (169) यांनी काँग्रेसच्या सागर विनायक चौधरी (166) यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या शिवाजी आनंदा चौधरी यांना अवघी 84 मते पडली. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाच्या प्रतिभा वसंत मनकर (481) यांनी राष्ट्रवादीच्या मंदा तान्हाजी पांडे (254) यांचा तब्बल 227 मतांनी पराभव केला. मनसेच्या जयश्री दत्तात्रय नवले यांना 51 तर शिवसेनेच्या ठकुबाई पोपट शिंदे यांना अवघी सहा मते मिळाली.
प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाचे हितेश रामकृष्ण कुंभार (250) यांनी काँग्रेसचे फैजान शमशुद्दीन तांबोळी (153) यांचा 97 मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या श्रीकांत सुधाकर मैड यांना 124 तर अपक्ष उमेदवार योगेश मुकुंद जोशी यांना 94 मते मिळाली. प्रभागा क्रमांक पाचमध्ये भाजपाच्या सोनाली लक्मीकांत नाईकवाडी (416) यांनी शिवसेनेच्या गणेश भागुजी कानवडे (346) यांचा 70 मतांनी पराभव केला. मनसेच्या हर्षल रमेश गुजर यांना केवळ सात मते पडल्याने त्यांची अनामत जप्त झाली.
प्रभागात सहामध्ये राष्ट्रवादीच्या श्वेताली मिलिंद रुपवते (346) यांनी भाजपाच्या शैला विश्वनाथ घोडके (290) यांचा 73 मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या कांचन किशोर रुपवते यांना 28 मते मिळाली. प्रभागा क्रमांक सातमधून राष्ट्रवादीच्या आरिफ शमशुद्दीन शेख (393) यांनी भाजपाच्या मैनुद्दीन बद्रोद्दीन शेख (296) यांचा 97 मतांनी पराभव केला. माकपच्या सचिन सदाशिव ताजणे यांना 90 मते मिळाली.
प्रभागा आठमध्ये भाजपाच्या बाळासाहेब काशिनाथ वडजे (557) यांनी राष्ट्रवादीचे अशोक दत्तु गायकवाड (288) यांचा विक्रमी 329 मतांनी पराभव केला. शिवसेना बंडखोर उमेदवार जयराम विठोबा गायकवाड यांना 48 तर मनसेच्या शिवाजी रामनाथ गायकवाड यांना 20 मते मिळाली. प्रभाग नऊमध्ये भाजपाच्या शितल अमोल वैद्य (347) यांनी राष्ट्रवादीच्या भिमा बबन रोकडे (216) यांचा सरळ लढतीत 131 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेचे नवनाथ विठ्ठल शेटे (137) अवघ्या 45 मतांनी विजयी झाले. भाजपाचे अनिल गंगाधर नाईकवाडी व राष्ट्रवादीचे बंडखोर संदीप भाऊसाहेब शेणकर या दोघांनी प्रत्येकी 92 तर काँग्रेसचे मयुर शेटे यांनी 62 व अपक्ष प्रकाश संपतराव नाईकवाडी यांनी अवघी चार मते मिळविली. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपाच्या वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (258) यांनी राष्ट्रवादीच्या वंदना भागवत शेटे (251) यांचा अवध्या सात मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या वनिता रामदास शेटे यांना 140 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक बारा मधून भाजपाच्या तमन्ना मोहसीन शेख (423) यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अनिता शरद पवार (187) यांचा 236 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या निलोफर गफ्फार कुरेशी यांना 99 तर काँग्रेसच्या सुमन सुरेश जाधव यांना 24 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपाच्या जनाबाई नवनाथ मोहिते (268) यांनी राष्ट्रवादीच्या आरती सुरेश लोखंडे (216) यांचा 52 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक चौदामधून भाजपाचे शरद एकनाथ नवले (267) अवध्या 15 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र यादव नाईकवाडी (252) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या पांडूरंग बाबुराव डमाळे यांना 188 मते मिळाली. प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेसच्या प्रदीपराज बाळासाहेब नाईकवाडी (322) यांनी भाजपाचे सचिन संदीप शेटे (190) यांचा 132 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या संतोष कारभारी नाईकवाडी यांना 97 व शिवसेना बंड खोर उमेदवार अजय भिमराज वर्पे यांना अवघी तीन मते मिळाली.
प्रभाग क्रमांक सोळामधून भाजपाच्या माधुरी रविंद्र शेणकर (147) यांनी काँग्रेसच्या मिना प्रकाश भांगरे (142) यांचा अवघ्या पाच मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या कुमारी पूजा तुकाराम भांगरे यांना 92 मते मिळाली. तर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये भाजपाच्या कविता परशूराम शेळके (291) यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादीच्या आशा रविंद्र पानसरे (156) यांचा 135 मतांनी पराभव केला. एकंदरी अकोले नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांच्या नेतृत्त्वाखालील सत्ताधारी भाजपाने आपला गढ शाबुत ठेवतांना तब्बल बारा जागा मिळवित निर्विवाद बहुमतही प्राप्त केले.
एकूण सतरा जागांसाठी दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसह आघाडी केली होती, तर कॉग्रेसने स्वबळ अजमावले होते. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सतरातील बारा जागा मिळविल्या. यातील पराभूत पाचपैकी चार ठिकाणी भाजपा दुसर्या क्रमांकावर आहे. प्रत्येकी सहा ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी तर एका ठिकाणी शिवसेना व एका ठिकाणी बंडखोर दुसर्या स्थानी आहे. 17 जागांच्या अकोले नगरपंचायतीत आता भाजपाचे 12, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक असे बलाबल आहे.
tDupFfoMPJSWRL