शेवगाव । वीरभूमी - 19-Jan, 2022, 05:19 PM
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. आज भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव येथे पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना निवेदन देऊन नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, शहराध्यक्ष रवी सुरवसे, सरचिटणीस भिमराज सागडे, हाजी सालार शेख, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, संदीप वाणी, अर्जुन ढाकणे, उमेश धस, गंगा खेडकर, अंबादास ढाकणे, अजय डमाळ, नवनाथ अमृत, विठ्ठल भिडे, मच्छू बर्वे, नितीन मालानी, तुषार पुरनाळे, पंकज भागवत, शुभम काथवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले, पंतप्रधान हे कुणी एका पक्षाचे नसतात, तर ते अखंड भारताचे प्रतिनिधित्व करतात. देशाच्या प्रमुख व्यक्तीवर मारणे, शिव्या देणे असे वक्तव्य करणे हा देशद्रोह आहे, अशा व्यक्तीस आघाडी सरकार पाठीशी घालत असून या व्यक्तीवर आत्तापर्यंत गुन्हा दाखल होऊन अटक होणे अपेक्षित होते. परंतु आघाडी सरकारकडून याबाबत कोणतेही कार्यवाही होताना दिसत नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याचे कारण देत प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता दाखवली ती तत्परता नाना पटोले यांच्याविषयी का होत नाही असा सवाल यावेळी जिल्हा अध्यक्ष अरूण मुंढे यांनी प्रशासनाला केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यावेळी म्हणाले.
Comments