नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण
कर्जत । वीरभूमी - 27-Jan, 2022, 07:13 PM
कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षपदी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या ९ महिला नगरसेवकातून नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदी कोण होणार याचे सर्वाधिकार आ रोहित पवार यांच्याकडे राहतील. गुरुवारी मुंबई येथे नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत संपन्न झाली.
१९ जानेवारी रोजी कर्जत नगरपंचायतीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपाच्या ताब्यात असलेली सत्ता आपल्याकडे खेचली. आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १२ तर काँग्रेसने ३ जागेवर विजय संपादन करीत भाजपाचा दारुण पराभव केला होता.
निकालानंतर सर्वांचे लक्ष नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे लागले होते. मात्र नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत झाली नसल्याने ते नाव गुलदस्त्यात होते. गुरुवार, दि २७ रोजी नगराध्यक्ष पदासाठी मुंबई येथे आरक्षण सोडत संपन्न झाली.
यामध्ये कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने आता ९ महिला उमेदवारापैकी कोणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार आ रोहित पवार यांच्याकडेच राहतील अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली आहे.
भाजपाच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या ताब्यात घेत माजीमंत्री राम शिंदेना झटका दिला. आ. रोहित पवार यांनी विकासाच्या राजकारणावर निवडणूक केंद्रीत करत त्यांना चारीमुंड्या चित केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस ७ महिला उमेदवारामधून आपला पहिला नगराध्यक्ष कोण करणार ? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. पहिल्या वेळेस कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती-जमाती (एससी) महिलासाठी राखीव होते.
Comments