कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने शेतकरी संतप्त
अकोले । वीरभूमी - 28-Jan, 2022, 03:53 PM
अकोले तालुक्यात थकित कृषी पंपाच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून कोणतीही पूर्व सुचना न देता शेतीपंपांना वीजपुरवठा करणार्या रोहित्रांची वीज तोडण्याची कारवाई केली जात आहे. महावितरणच्यावतीने आजपर्यंत तब्बल 550 रोहित्रांची वीज तोडली आहे.
महावितरणच्या या कारवाईच्या निषेधार्थ माजी आ. वैभवराव पिचड यांनी अकोले बंदची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळत प्रतिसाद मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकर्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता वीजबिल वसुलीसाठी जवळपास 550 रोहित्र बंद करून शेतकर्यांना वेठीस धरीत आहे. याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शेतकर्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. मात्र त्या मागण्या मान्य न झाल्याने आज ‘अकोले बंद’चा नारा दिला होता.
शेतकर्यांच्या हितासाठी व त्यांच्या वेदना सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी सहभागी व्हावे म्हणून सर्व व्यापारी वर्गाला दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व व्यापारी वर्गानी (अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता) आपली दुकाने बंद ठेवली. विशेष म्हणजे आज भाजपचे पक्ष कार्यालय ही बंद ठेवण्यात आले होते.
या बंदला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सर्वांचे आभार मानले. आणि अकोले शहरातुन रिक्षा फिरवूनही सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानले.
TBJPaghNomOGlIp