संगमनेर । वीरभूमी - 09-Feb, 2022, 03:26 PM
संगमनेर शहर हे आर्थिक सुबत्ते बरोबर वैद्यकीय सुविधांसाठी उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटात विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध कोवीड केअर सेंटर मधील चांगल्या सुविधामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
मात्र कोणतेही काम नसणार्यांनी संगमनेरवर केलेले वक्तव्य हे फक्त प्रसिद्धीसाठी असून असे वक्तव्य पराभूत मनोवृत्ती व नैराश्यातून होत आहे. त्यांनी अगोदर राहाता तालुक्याची अवस्था पाहावी अशी खरमरीत टीका काँग्रेसचे नेते सुरेश थोरात यांनी विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता केली.
काँग्रेसचे नेते सुरेश थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, राहाता तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी संगमनेर तालुक्यावर बोलावे हा जिल्ह्यात एक मोठा विनोद आहे. संगमनेर हा सर्वांगीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड कायम असून नामदार थोरात हे राज्यात अत्यंत महत्त्वाचे पद सांभाळताना जनसामान्यांची काळजी घेत आहेत.
कोरोनाच्या संकटात अविश्रांत काम करताना राज्य, जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात त्यांनी विना प्रसिद्धी नागरिकांना मोठी मदत केली. ऑक्सिजनच्या टंचाई काळामध्ये नामदार थोरात यांनी केलेले मदत कार्य सर्वश्रुत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, शेतकी संघ यांचे विविध सहकारी संस्थांनी दोन्ही लाटेमध्ये कोविड केअर सेंटर उभे केले.
वसंत लॉन्स येथे कारखान्याचे 500 बेडचे अद्यावत कोविड केअर सेंटर होते. या विविध कोविड सेंटर मधील चांगल्या सुविधा व वैद्यकीय उपचारांसाठी संगमनेर, अकोले, सिन्नर, जुन्नर, राहाता, कोपरगाव, पारनेर या ठिकाणांमधील अनेक नागरिक संगमनेरला येत होते. संगमनेर हे मेडिकल हब झाले होते.
यामध्ये अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. उलट राहाता तालुक्यामध्ये कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे राहाता व शिर्डी परिसरातील अनेक नागरिक उपचारासाठी संगमनेरला येत होते. प्रवरानगर येथील कोविड सेंटरसाठी गोळा केलेल्या मदत निधीचा हिशोब बाकी आहे. अजून त्यांना तो देता आलेला नाही.
या संकट काळात पिता-पुत्र घरात बसून होते. जनतेला हे सर्व माहिती आहे. प्रसिद्धीत राहण्यासाठी ते नैराश्यातून काही तरी चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य करत असतात. त्याकडे राहाता तालुका, संगमनेर व जिल्ह्यातील कोणतेही नागरिक लक्ष देत नाहीत.
संगमनेर तालुक्यात कोरोना संकटात झालेले काम जनतेला माहिती आहे. याउलट राहाता तालुक्यातील अवस्थाही लोकांना माहिती आहे. त्यांनी अगोदर राहाता तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, मग संगमनेर बाबत बोलावे, असा सल्लाही सुरेश थोरात यांनी दिला आहे.
BUdZiELM