दोन्ही मुलींची सुटका । शेवगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
शेवगाव । वीरभूमी- 16-Feb, 2022, 01:29 PM
रस्त्यावरुन जाणार्या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी कार्तीक राजेंद्र काळे (वय 20, रा. आयशानगर, शेवगाव) याच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही अपहरणाची घटना मंगळवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शेवगाव-नेवासा रोडवर घडली.
या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनीच मुलीचे सुटका केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्या महिलेच्या दोन मुली शेवगाव - नेवासा रस्त्याने आईकडे सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पायी चालल्या होत्या. दरम्यान कार्तिक राजेंद्र काळे (वय 20, रा. आयशानगर, शेवगाव) याने दोन्ही मुलींना आपल्या टेरेनो कार (क्र. एमएच 12, एमएफ 7700) मध्ये बसवून घेवून पळवून गेला.
दरम्यान हॉस्पिटलमध्ये गेलेली महिला घरी आल्यानंतर तीला आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. महिलेने पतीसह मुलींचा शोध घेतला असता मुली सापडल्या नाहीत.
दरम्यान सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण झालेल्या मुली लांडेवस्ती जवळ बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावर डांबून ठेवल्याची माहिती अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी सदरील ठिकाणी जावून मुलींची सुटका करत आरोपी कार्तिक राजेंद्र काळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कार्तिक राजेंद्र काळे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या दोन्ही मुलींचे आरोपीने अपहरण कशासाठी केले याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक शेळके हे करत आहेत.
Comments