शेवगाव । वीरभूमी- 22-Feb, 2022, 04:39 PM
अंध अपंगाचे बनावट प्रमाणपत्र पैसे घेवून बनवून देणार्या दोघांना शेवगाव पोलिसांनी रंगहात पकडून बनावट अपंग प्रमाणपत्राचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई शेवगाव पोलिसांनी सोमवार दि. 21 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास करून आज मंगळवार दि. 22 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शेवगाव तालुक्यातील बनावट प्रमाणपत्राचा पर्दाफाश झाला असून आरोपींनी कोणकोणाला बनावट प्रमाणपत्र दिले याचा शोध पोलिस घेत आहेत. यामुळे बनावट प्रमाणपत्र बनवून घेणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत समजलेली हकिगत अशी की, शेवगाव - दादेगाव रोडच्या बाजुला टाटा इंडिगो (क्र. एमएच 17, एजे 8935) कारमध्ये एक व्यक्ती पैसे घेवून अपंगाचे बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. प्रभाकर पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत समजली. या माहितीची खातरजमा करून पोनि. पाटील यांनी पोहेकाँ. नाकाडे, पोहेकाँ. वीर, पोना. बाबासाहेब शेळके, पोकाँ. शिरसाठ, पोकाँ. धाकतोडे यांना सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
यानंतर पथकाने दोन पंचासमक्ष सदरील ठिकाणी छापा टाकला असता दादेगाव रोडच्या बाजुला इंडिगो कारमध्ये बसून संजय स्वरुप राजेभोसले (वय 62, रा. औदुंबर बंगला, लांडेवस्ती, शेवगाव) हा महाराष्ट्र शासन नाव असलेले ओळखपत्र, गर्व्हमेंट ऑफ महाराष्ट्र असे नाव असलेला गोल शिक्का, त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले कागदपत्र आढळून आले.
यातील आरोपी संजय स्वरुप राजेभोसले हा परमेश्वर भगवान बडे (रा. सामनगाव हल्ली रा. मगर वस्ती, शेवगाव) याच्या राहते घरी संगणमताने बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी बडे याच्या घरी छापा टाकला असता तेथे विविध प्रकारचे शिक्के असलेली कागदपत्रे, कोरे ओळखपत्रे, अपंगासाठी लागणारे कोरे प्रमाणपत्र आढळून आले.
आरोपींकडे आढळलेल्या कागदपत्रामध्ये धुळे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राज्य परिवहन आगार व्यवस्थापक यांच्या नावाचे शिक्के मारलेले कागदपत्रे, कोरे ओळखपत्र असे आढळून आले. तसेच ढोरजळगाव, लाडजळगाव, शास्त्रीनगर (शेवगाव), चर्हाट (ता. पाटोदा), असे शिक्के मारलेले कोरे कागदपत्र आढळून आले आहेत.
शेवगाव पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली इंडिगो कार, कागदपत्रे, कोरे ओळखपत्र, अपंगासाठी सवलतीच्या प्रवासासाठी लागणारे ओळखपत्र जप्त केली आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात पो.ना. संतोष चंद्रकांत काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी संजय स्वरुप राजेभोसले (रा. लांडेवस्ती, शेवगाव) व परमेश्वर भगवान बडे (रा. सामनगाव, हल्ली रा. मगर वस्ती, शेवगाव) या दोघांवर सरकारी व निमसरकारी कार्यालयाचे शिक्के असलेली कागदपत्रे जवळ बाळगून जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments